छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका आयुक्तांची हुकूमशाही सुरू आहे. आठवडी बाजार बंद झाले, तर आम्ही आत्महत्या करू. आम्ही अफगाणिस्तानचे नसून इथलेच आहोत. आम्ही संपूर्ण आयुष्य या व्यवसायावर काढले. आमची मुले लग्नाला आली आहेत. या धंद्यावर आम्ही कर्ज काढले आहे. जर व्यवसाय बंद झाला, तर आम्ही कर्ज फेडायचे कसे आणि जगायचे कसे असा प्रश्न आम्हासमोर आहे. कामगारांचा पगार कसा द्यायचा. आम्हाला आता कोणी रोजगार देणार नाही. त्यामुळे आम्हाला चोरीचे परवाने द्यावेत. आम्ही चोऱ्या करतो किंवा महापालिका आयुक्तांनी पगार सुरू करावा, अशी मागणी भाजीपाला व्यावसायिकांनी केली. दुसरीकडे नगरसेविकांनी बाजार रस्त्यावर भरू नये, तो गाळ्यात भरावा अशी भूमिका मांडली. छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा, जाफर गेट आणि शहानूरमियाँ दर्गा (पीर बाजार) येथील ऐतिहासिक आठवडी बाजार कायमचे बंद करण्याची घोषणा महापालिका आयुक्तांनी केलीय. विशेष म्हणजे या भागात सध्या भाजीपाला मंडईची महापालिकेची कसलिही योजना नाही. तत्पूर्वीच हे बाजार आता बंद केले जाणार आहेत. त्यामुळे दिव्य मराठी डिजिटलने शहानूरमियाँ दर्गा येथील आठवडी बाजारात जाऊन व्यापारी, नागरिक आणि राजकीय नेत्यांची मते जाणून घेतली. त्याचाच हा ग्राउंड रिपोर्ट... सध्याची स्थिती काय? सध्याचे छत्रपती संभाजीनगर आणि पूर्वाश्रमीच्या औरंगाबाद महापालिकेची स्थापना 8 डिसेंबर 1982 रोजी झाली. तत्पूर्वी येथे नगरपालिका होती. शहराच्या हद्दीत 18 गावांचा समावेश करून तिला महापालिकेचा दर्जा दिला गेला. विशेष म्हणजे या महापालिकेच्या स्थापनेपूर्वीपासून सुरू चिकलठाणा, जाफर गेट आणि शहानूरमियाँ दर्गा (पीर बाजार) येथे आठवडी बाजार भरतात. सध्या छत्रपती संभाजीनगरची लोकसंख्या तब्बल 20 लाखांच्या घरात पोहचलीय. त्यामुळे सध्याचे असलेले आठवडी बाजार कमी पडतात. उलट या आठवडी बाजरांच्या संख्येत वाढ होण्याची गरज आहे. शेतकरी, ग्राहकांचे नुकसान छत्रपती संभाजीनगरच्या आठवडी बाजारामध्ये शेतकरी स्वतःचा भाजीपाला विकायला आणतात. विशेषतः कन्नड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण, ते चक्क सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातले शेतकरी या बाजारात येतात. प्रत्येक बाजारातून जवळपास तीस लाखांच्या घरात उलाढाल होते. मध्यस्थाविना ग्राहकांना अतिशय कमी दरात भाजीपाला आणि धान्य खरेदी करायला मिळते. आठवडी बाजार वगळता इतरवेळी याच भाजीपाल्याची किंमत ही दुप्पट ते अनेकदा चौपट असते. मात्र, हे आठवडी बाजार बंद झाले तर शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील थेट दुवाच काढून घेतला जाईल. त्यामुळे या दोघांचेही नुकसान होईल. गाळ्यामध्ये बाजार भरावा - त्र्यंबक तुपे दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना प्रभाग क्र 20 चे नगससेवक त्र्यंबक तुपे म्हणाले की, 'आठवडी बाजाराची संकल्पना अनेक वर्षांपासून आहे. शहरातील 3 प्रमुख बाजार आहेत. पीर बाजार हा रस्त्यावर भरला जावू नये असे स्थानिक नागरिकांची मागणी आहे. मनपाने जे गाळे बांधून दिले आहेत, त्या गाळ्यामध्ये हा बाजार भरावा. या बाजारामुळे रस्त्यावर पायी जाता येत नाही अशी परिस्थिती असते. काही वेळा रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीत अडकतात हे आम्ही पाहिले आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या व्यापाऱ्यांना व्यापारासाठी व्यवस्था करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. महापौर आणि आयुक्तांशी झालेल्या चर्चेत एक विषय पुढे आला की आठवडी बाजार न करता प्रत्येक दिवशी बाजार करता येऊ शकतो का यादृष्टीने आम्ही काम करत आहोत. रस्त्यावर बसलेल्या व्यापाऱ्यांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी आम्ही मनपा म्हणून घेणार आहोत. दुकाने मर्यादित असले तरी जर व्यापारी वाढले, तर आपण 8 ठिकाणी भाजी मार्केट वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. अनेक ठिकाणी बाजारांसाठी जागा दिलेली आहे. चौकातील व्यापारी जो पर्यंत गाळ्यांपर्यंत येत नाही तो पर्यंत रस्त्यावर वाहतूक कोंडी होत राहिल. रोडवर कुणीही बसता कामा नये, आम्ही त्यांची काळजी घेऊ.' बाजार रोज भरेल - सविता कुलकर्णी दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना प्रभाग क्र 26 च्या नगरसेविका सविता कुलकर्णी म्हणाल्या की, 'मनपाचा कोणाच्याही पोटावर पाय देण्याचा काही हेतू नाही. पण काय होते दर सोमवारी या परिसरातील टॅक्स भरणाऱ्या लोकांना वाहतूक कोंडी, अस्वच्छता या गोष्टींना सामोरे जावे लागते. आता प्रत्येक परिसरात भाजी घेऊन येणाऱ्या गाड्या फिरतात. ताज्या भाज्या घेण्याकडे लोकांचा ओढा दिसून येतो. मंगळवारी या ठिकाणी मोठा कचरा पडलेला दिसून येतो. हा कचरा मनपाने उचलला पाहिजे. ते उचलतात सुद्धा. हे जे लोक रस्त्यावर गाड्या लावतात त्यांच्याकडून काही लोक चुकीच्या पद्धतीने हप्ते वसुली करतात. त्यांना पावती सुद्धा देण्यात येत नाही. रोडची जागा भाड्याने देता येत नाही. आम्ही आठवडी बाजाराच्या ठिकाणी ओटे बांधून देणार आहोत. तिथे दररोज भाजी विक्री सुरू होऊ शकते. कुणाच्याही पोटावर पाय देण्याचा आमचा हेतू नाही. पण दादागिरी करत रस्त्यावर गाड्या लावू नये यासाठी मनपाने हा निर्णय घेतला आहे. पीर बाजार आणि शहागंमध्ये भरणारा बाजार याची तुलना होऊच शकत नाही. तिथे रहिवासी वस्ती कमी आहे, पण त्यांनी कारवाईची मागणी केली, तर तिथेही कारवाई करण्यात येईल. या परिसरातील लोकांनी मागणी केल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे. बाजार बंद करणार नाही, तर रोजचा बाजार सुरू करणार आहोत. केवळ रस्त्यावर भरणाऱ्या बाजाराला आमचा आक्षेप आहे.' पोटावर पाय नको - अर्चना नीळकंठ दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना प्रभाग क्र 20 च्या नगरसेविका अर्चना नीळकंठ म्हणाल्या की, 'आमच्या प्रभागातील काही भागातील नागरिकांनी आम्हाला निवेदन दिले की पीर बाजारमुळे आम्हाला त्रास होतो. वाहतूक कोंडी होते. अस्वच्छता राहते. त्यामुळे हा बाजार बंद व्हावा ही नागरिकांची इच्छा आहे. पण कोणाच्या पोटावर पाय पडावा असे आमचे म्हणणे नाही. आठवडी बाजार नियोजित जागेत भरावा. ज्यामुळे जनतेला होणारा त्रास होणार नाही. आठवडी बाजार बंद करायचा का नाही या विषयी आयुक्त आणि महापौर निर्णय घेतील.' आधी पाणी, गाळ्याचे पाहा दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना तरुण शेतकरी व्यापारी म्हणाला की, 'आपल्याकडे लोकशाही राहिली नाही. राजेशाही सुरू आहे. ज्याच्याकडे सत्ता आहे, लोक काहीही करू शकतात. आमच्याकडे चौदा दिवस पाणी येत नाही. ज्यांचे गाळे पाडले ते दिले नाहीत. शहरात अनेक प्रश्न आहेत. मात्र, त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. बाजाराच्या दिवशी वाहतूक कोंडी होते म्हणतात, पण आम्ही व्यापारी त्यावर काय करणार? स्वच्छतेचे काम मनपाने केले पाहिजे. आम्ही इथे बसण्याचे पैसे देतो. गाडी आत आणायचे पैसे देतो. आम्हाला पैसे देऊन सुद्धा काहीही सुविधा दिली जात नाही. चिखल साफ करत बसावे लागते. तुम्ही आमच्या जागेवर येऊन विचार करा ना? आम्ही काही अफगाणचे नाही. आमच्या आठवडी बाजाराला ना भाजपचा विरोध आहे, ना दुसऱ्या कोणत्या पक्षाचा. केवळ मनपा आयुक्तांचा बाजाराला विरोध आहे. त्यांना वाटते तसे ते वागतात.' विषय दिल्लीपर्यंत नेणार दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना शेतकरी व्यापारी म्हणाला की, 'आठवडी बाजारात आम्ही हजारोंच्या संख्येने बसलेलो आहोत आणि महापालिका मोजकेच गाळे बांधून देणार आहे. मग बाकीच्या व्यापाऱ्यांनी कुठे जायचे. मनपा त्यांना नोकरी देणार का? आमचे सर्व घर यावर चालते. हे जर बंद झाले तर आम्ही काय करावे? हजारो व्यापाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. आम्ही या संदर्भात महापौर, उपमहापौर यांची भेट घेणार आहोत. या संदर्भात रोहित पवारांची भेट घेणार असून त्यांच्या मार्फत हा विषय मुंबई आणि जर काहीच झाले नाही तर सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून हा विषय आम्ही दिल्लीपर्यंत नेऊ पण थांबणार नाही.' एका ठिकाणी बसू शकत नाही ज्येष्ठ व्यापारी म्हणाले की, 'आठवडी बाजारासाठी जी जागा नियोजित केली आहे, त्याच्या बाहेर बसणाऱ्या लोकांवर महापालिकेने कारवाई केली पाहिजे. आमच्याकडून जी वसुली केली जाते त्यातून स्वच्छता केली गेली पाहिजे. जे लोक रस्त्यावर बसतात ते दादागिरी करतात. त्यांना उठवणे आमचे काम नाही. हे काम महापालिकेने केले पाहिजे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगरसह महाराष्ट्रातल्या अनेक शहरात असे बाजार भरतात. कुठल्याही मनपा आयुक्तांनी असा निर्णय घेतलेला नाही. संपूर्ण शहरात वाहतूक कोंडी होते ती काही आमच्यामुळे नाही. शहरात वाहतूक कोंडी होते म्हणून तुम्ही लोकांना गाड्या बाहेर काढू नका, असे सांगणार का? आम्ही बाजार करणारी लोक इथे घाण करत नाही. ही घाण दुसरे व्यापारी इथे आणून टाकतात. आम्ही एकाच ठिकाणी गाळे घेऊन बाजारात बसू शकत नाही. आम्ही आठ दिवस 8 बाजारात जात व्यवसाय करतो.' वसुली केली जाते, पावती मिळत नाही एका फळ विक्रेता महिला म्हणाली की, 'मनपा दुसरीकडे बाजारासाठी जागा देईल, पण तिथे ग्राहक येतील का? आम्ही रोडवर नसतो, गेली 20 वर्षे आम्ही बाजारात येतो. हे हातगाडीवाले रस्त्यावर गाड्या लावतात. आम्ही यावर लोन काढले आहे. हे जर बंद झाले तर आम्ही जगायचे कसे?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. फळ विक्रेता म्हणाला की, 'रोडवर ज्या गाड्या लागतात त्या लागू नये. सर्व दुकाने ठरलेल्या जागेत लागावी म्हणजे कोणालाही त्रास होणार नाही. आम्हाला बाजाराच्या दिवशी 100 रुपये द्यावे लागतात. त्यांची पावती मिळत नाही,' अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तर महिला ग्राहक म्हणाली की, 'आठवडी बाजार सुरू राहिला. हा बाजार जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मध्यभागी असलेला हा बाजार जर बंद झाला तर नागरिकांची मोठी गैरसोय होईल. जी अधिकृत जागा आहे ती कमी पडते, म्हणून हे व्यापारी, शेतकरी इथे बसतात त्यांच्याकडे पाहून हा बाजार बंद करू नये.' बाजार नियोजित जागेतच भरावा दुसऱ्या एका व्यापाऱ्याने बोलताना म्हटले आहे की, 'जर रस्त्यावर बाजार भरणार असेल तर मग हा बाजार बंद झालेलाच बरा. बाहेरचा बाजार बंद झाला आणि मध्ये सुरू राहिला तरच बाजाराचा फायदा आहे. बाहेर गर्दी होते गाडी लावायला जागा नसते म्हणून लोक मध्ये येत नाहीत आणि आमचा व्यापारच होत नाही. बाहेरील व्यापारी पैसे देतात म्हणून मनपावाले त्यांना बाहेर बसू देते. त्यांच्यामुळेच आमचा व्यवसाय होत नाही. मनपा आयुक्तांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. बाहेरील व्यापारी बंद झाले तरच मध्ये बसणाऱ्या लोकांचा व्यवसाय होऊ शकतो.' बाजार रोडवर नकोच, स्थानिकांना त्रास होऊ नये - सागर नीलकंठ भाजप पदाधिकारी सागर नीलकंठ म्हणाले की, आठवडी बाजार हा नियोजित जागेत भरला पाहिजे. स्थानिक लोकांना याचा त्रास होतो आणि वाहतूक कोंडी होते. पण त्यावर तो बंद करणे हा उपाय नाही. लोकांना त्रास होऊ नये हे अपेक्षित आहे. जर व्यवस्थित नियोजन केले, पार्किंग व्यवस्था केली तर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकतो. बाजारात बसणाऱ्या लोकांना एक नबरिंग दिले तर त्यातून मनपाला उत्पन्न मिळू शकते. बाजार हा रोड वर भरुच नये. तो ग्राउंडममध्ये भरावा. तिथे सार्वजनिक शौचालय सुरू केले पाहिजे. स्थानिक लोकांना सुविधा मिळावा म्हणून तिथे बाजाराच्या ठिकाणी स्वच्छता केली, लोकांना त्याचा त्रास झाला नाही तर लोक बाजार बंद करा म्हणणार नाही. नीलकंठ म्हणाले, कंत्राटदाराने जर बाजार स्वच्छ ठेवला तर हा प्रश्नच येणार नाही आणि जर मनपाने केले तर अतिशय उत्तम नियोजन करता येईल. उद्दाम व्यापऱ्यांना जागा देण्यापेक्षा शेतकरी अन् छोट्या व्यापाऱ्यांना जे गरजू आहे त्यांना बाजारात स्टॉल दिले पाहिजे. जर बाजारातील व्यापारी यांनी शिस्त पाळली तर आठवडी बाजार बंद करण्याची गरजच पडणार नाही. स्मार्ट बाजार केला, सुविधा दिली तर व्यापाऱ्यांना सुद्धा फायदा होईल. मनपाने हा प्रयोग केला तर नवीन इनकम सुरु होईल.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/RBpbuMD
आठवडी बाजार बंद झाला तर आत्महत्या करू:छत्रपती संभाजीनगरच्या शेतकरी व्यापाऱ्यांचा इशारा, नगरसेवक म्हणतात बाजार रस्त्यावर नको, वाचा ग्राउंड रिपोर्ट
March 30, 2026
0