अचलपूर-परतवाडा येथील नगरपालिका जलतरण तलाव गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पुन्हा सुरू करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या काळात बंद पडलेला हा तलाव जुळ्या शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची सुविधा ठरला आहे. या जलतरण तलावाचे उद्घाटन नगराध्यक्ष रुपाली माथने आणि आमदार प्रवीण तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कोरोना काळात बंद पडल्याने या तलावाची दुरवस्था झाली होती. नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीची दखल घेत, मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर तो पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना आमदार प्रवीण तायडे यांनी सांगितले की, जलतरण तलाव सुरू झाल्यामुळे नागरिकांना आरोग्यदायी व्यायामाची सुविधा मिळाली आहे. यामुळे क्रीडा विकासाला चालना मिळेल. पोहणे हा उत्तम व्यायाम प्रकार असून, युवकांमध्ये क्रीडा संस्कार वाढण्यास याचा मोठा फायदा होईल, तसेच खेळाडूंना सरावासाठी चांगली संधी मिळेल. नगराध्यक्ष रूपाली माथने यांनी सांगितले की, जलतरण तलाव सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार होत होती. आवश्यक दुरुस्ती व स्वच्छता करून नववर्षाच्या निमित्ताने ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यावेळी मुख्याधिकारी धीरज गोहाड, महिला व बालकल्याण सभापती दुर्गा सोनपरोते, नियोजन सभापती दर्शना ठाकूर, नगरसेविका अपर्णा रोडे आणि आरोग्य सभापती समशेर खान उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज प्रभाग क्रमांक ७ मधील कल्याण मंडपम परिसरात हा जलतरण तलाव आहे. आमदार प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष आणि या प्रभागाच्या नगरसेविका तसेच राज पाटील यांनी स्विमिंग पूल सुरू करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. स्विमिंग पूलची योग्य देखरेख व संचालन व्हावे यासाठी आवश्यक प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती अभियंता मनीष शर्मा यांनी दिली. सध्या हा स्विमिंग पूल पालिकेमार्फत चालविण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी स्विमिंग पूल परिसराची पाहणी केली. यावेळी नगरसेवक ल. ज. दीक्षित, सुरेंद्र तांबे, अक्षय पखाले, चंद्रेश बहोरिया, स्वीकृत सदस्य अभय माथने, निल माहेश्वरी, उपसभापती हेमा आसवानी, नगरसेविका अक्षरा लहाने, कविता आखूड, सारिका डांगे, अभियंता निशांत मिश्रा, कंत्राटदार सुनील अग्रवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/pTBdZWw
अचलपूर-परतवाडा जलतरण तलाव पुन्हा सुरू:गुढीपाडव्याला जुळ्या शहरांना कोरोना काळानंतर मिळाली सुविधा
March 21, 2026
0