Type Here to Get Search Results !

नेहरू मैदानात 24 मार्चपासून शिवकेसरी कुस्ती दंगल:पुरुष, महिला, कुमार गटात स्पर्धा; लाखो रुपयांची बक्षिसे

अमरावती येथील नेहरू मैदानात मंगळवार, २४ मार्चपासून शिवकेसरी कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली आहे. नमो युवक संस्था, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि विदर्भ कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पुरुष, महिला आणि कुमार अशा तीन गटात होणार आहे. आयोजकांनी माध्यमांशी संवाद साधताना या स्पर्धेची माहिती दिली. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नगरसेवक ॲड. प्रशांत देशपांडे, विदर्भ कुस्तीगीर परिषदेचे नगरसेवक प्रा. डॉ. संजय तिरथकर आणि नमो युवक संस्थेचे अध्यक्ष करण डेंडवाल यांनी सांगितले की, या स्पर्धेच्या माध्यमातून लाखो रुपयांची बक्षीसे दिली जाणार आहेत. ही राज्यस्तरीय स्पर्धा असल्याने महाराष्ट्रातील नामवंत मल्ल यात सहभागी होतील. स्पर्धेचे उद्घाटन २४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता होईल, तर पुरस्कारांचे वितरण दुसऱ्या दिवशी, २५ मार्च रोजी एका विशेष सोहळ्यात केले जाईल. या स्पर्धेत सुमारे ३०० मल्ल सहभागी होणार असून, ते २३ मार्च रोजी अमरावती शहरात दाखल होतील. स्पर्धा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने पुरवलेल्या १२ बाय १२ फुटाच्या मॅटवर खेळवली जाईल. एकाच वेळी किमान तीन मॅटवर कुस्तीचे सामने सुरू असतील. प्रत्येक गटातील विजेत्यांना चांदीची गदा आणि रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. या स्पर्धेसाठी सुमारे ५ हजार क्रीडाप्रेमी बसू शकतील अशी लाकडी गॅलरी उभारण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला प्रशांत हरकुट, दीपक सम्राट (साहू) आणि कौशिक अग्रवाल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. अमरावती शहराची ओळख साहित्य, शिक्षण आणि क्रीडानगरी म्हणून आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ ही संस्था येथे आहे. या संस्थेने कुस्तीसाठी स्वतंत्र विभाग तयार केला असून, अनेक विदर्भ केसरी आणि महाराष्ट्र केसरी मल्ल घडवले आहेत. या आयोजनातून शहर आणि जिल्ह्यात खेळ व क्रीडाविषयक जागरूकता निर्माण करण्याचा तसेच शरीर बळकट करण्याचा संदेश दिला जाणार आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/GN61KDM

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.