Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र केसरीचे अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट:गादीत जय पाटील, हर्षवर्धन; तर मातीत महेंद्र गायकवाड, सिकंदर शेख अंतिम फेरीत

६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील किताब गटाच्या गादी आणि माती विभागातील उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीच्या लढती नुकत्याच पार पडल्या. या थरारक लढतींमधून अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. गादी विभागातून सोलापूरचा जय पाटील आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांनी, तर माती विभागातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि हिंगोलीचा सिकंदर शेख यांनी अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. गादी विभागातील उपांत्य फेरीत सोलापूरच्या जय पाटीलने पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळला पहिल्याच मिनिटात चितपट करत दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या उपांत्य फेरीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलवर ६-२ अशा गुणांनी मात करत अंतिम फेरीत धडक मारली. यापूर्वी, गादी विभागाच्या उपांत्यपूर्व फेरीत काही अनपेक्षित निकाल लागले. अकोल्याचा सिद्धांत गवई गैरहजर राहिल्याने पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित करण्यात आले. सोलापूर शहराच्या जय पाटीलने साताऱ्याच्या दिग्विजय जाधववर १०-० अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. कोल्हापूरचा अनुभवी मल्ल पृथ्वीराज पाटील आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्यातील लढत अत्यंत चुरशीची ठरली. यात पृथ्वीराज पाटीलने १०-६ गुणांनी विजय संपादन केला. नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या अक्षय मंगवडेला भारंदाज डावावर गुण मिळवत पराभूत केले. माती विभागातील उपांत्यपूर्व फेरीतही अनेक रोमांचक लढती झाल्या. सोलापूर शहराच्या रविराज चव्हाणने कोल्हापूरच्या शुभम शिंदनाळेवर ५-२ अशी सरशी साधली. सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने सांगलीच्या इम्रान मुजावरला १०-० अशा मोठ्या फरकाने पराभूत करत अंतिम फेरीकडे कूच केली. हिंगोलीच्या सिकंदर शेखने गडचिरोलीच्या विक्रमसिंग भोसलेला १२-२ अशा तांत्रिक गुणाधिक्याने हरवले. तर अहिल्यानगरच्या सुदर्शन कोतकरने भंडाऱ्याच्या रामचंद्र कांबळेविरुद्ध ६-३ असा विजय मिळवत पुढील फेरी गाठली. माती विभागातील उपांत्य फेरीत सोलापूर शहराचा ‘चपळ चित्ता’ रविराज चव्हाण आणि सोलापूरचा ‘बाहुबली’ महेंद्र गायकवाड यांच्यातील सामना विशेष गाजला. महेंद्रने सुरुवातीलाच भारंदाज डावावर 2 गुण घेत खाते उघडले. त्यानंतर पकडीवर आणखी 2 गुण मिळवत त्याने वर्चस्व प्रस्थापित केले. भारंदाज आणि पकड या प्रभावी डावांच्या जोरावर महेंद्र गायकवाडने 10-0 असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात हिंगोलीचा सिकंदर शेख आणि अहिल्यानगरचा सुदर्शन कोतकर यांच्यात जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. सुदर्शनने सुरुवातीलाच ताबा मिळवत 3 गुणांची आघाडी घेतली आणि पहिल्या फेरीत वर्चस्व राखले. मात्र पुढे गुण न घेतल्याने सिकंदरला 1 गुण बहाल करण्यात आला. त्यानंतर सिकंदरने आक्रमक खेळ करत पकडीवर 2 गुण मिळवले आणि सामना 3-3 असा बरोबरीत आणला. निर्णायक क्षणी सिकंदरने स्टेप आऊटचा 1 मौल्यवान गुण घेत 4-3 असा थरारक विजय नोंदवला आणि अंतिम फेरीतील स्थान पक्के केले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/oQbHPjD

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.