श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. आखाती देशातील युद्धाच्या परिणामामुळे गॅसटंचाई आहे. त्यामुळे हॉटेल बंद असल्याच्या अफवेमुळे गतवर्षीच्या एक लाख भाविकांच्या तुलने यंदा ५० हजार भाविकच दर्शनासाठी आले होते. गर्दी नसल्यामुळे काही वेळातच भाविकांना दर्शन मिळत होते. श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त शुक्रवारी पहाटे ४ वाजता श्रींची काकड आरती मंदिराचे पुरोहित मोहनराव महाराज, मंदार महाराज, व्यंकटेश महाराज यांच्या हस्ते व मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित नगर प्रदक्षिणेचा प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते प्रारंभ करून स्वामीनामाचा जयघोष करत भक्तिभावाने नगर प्रदक्षिणा मार्गस्थ झाली. प्रकटदिनी श्री स्वामींचे भक्तांना सुलभपणे दर्शन होण्यासाठी स्वामी भक्तांच्या वतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक बंद ठेवले होते. अभिषेकाची पावती करणाऱ्या स्वामी भक्तांना श्रीफळ, खडीसाखर प्रसाद देण्यात आले. सकाळी १० ते १२ या वेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थानच्या विश्वस्त उज्ज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळ यांच्या वतीने भजन होऊन गुलाल पुष्प वाहण्यात आले. त्यानंतर पाळणा झाला. दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्त निवास भोजनकक्ष येथे सर्व स्वामीभक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन प्रसाद देण्यात आला. यावेळी भाविकांनी परिसरातून मोठ्या प्रमाणात खरेदी केली. दर्शनरांगेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वामीभक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिराच्या उत्तरेकडील बाहेरील परिसरातील नवसाच्या मारुती मंदिरापर्यंत रस्त्याच्या लगत कापडी मंडप दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, वयोवृद्ध व विकलांग भाविकांना विशेष दर्शन व्यवस्था, आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचे दिसत होते.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Dnmq4NY
हॉटेल बंदच्या अफवेमुळे स्वामींच्या प्रकटदिनी भाविकांची संख्या घटली:अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचा वटवृक्ष मंदिरात प्रकटदिनी पाळणा
March 20, 2026
0