शहरातील गजानन महाराज मंदिर चौकात असलेल्या ‘गजानन हॉस्पिटल’ला रविवारी रात्री भीषण आग लागली. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व रुग्णांना वेळेत सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. मात्र, या आगीत रुग्णालयाचा तिसरा मजला संपूर्णपणे जळून खाक झाला आहे. रविवारी रात्री पावणेआठच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावर धुराचे लोट दिसू लागले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले व ज्वाळा ऑक्सिजन लाईनपर्यंत पोहोचल्यामुळे मोठी घबराट निर्माण झाली होती. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अंतर्गत अग्निशमन यंत्रणा वापरत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रुग्णांना रुग्णवाहिकांच्या साहाय्याने तातडीने जवळच्या इतर खासगी रुग्णालयांत उपचारासाठी हलवण्यात आले. रात्री ९ पर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. घटनाक्रमातील प्रमुख टप्पे रात्री ७:५० ते ८:०० : तिसऱ्या मजल्यावरून धुराचे लोट; आग ऑक्सिजन लाइनपर्यंत पोहोचल्याने मोठी खळबळ. रात्री ८:१० : अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू. रात्री ८:१५ : सर्व रुग्णांना रुग्णवाहिकेने सुरक्षितरीत्या जवळच्या रुग्णालयांत हलवण्यास सुरुवात. रात्री ९:०० : आगीवर पूर्ण नियंत्रण; ‘कूलिंग’ प्रक्रिया आणि नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरू. गजानन हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. (वर्तुळात) पेशंट हलवण्याचे काम सुरू आहे. एका बाजूने रस्ता बंद केला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/pOiFVIM
संभाजीनगरात रुग्णालयाला भीषण आग:रुग्ण बचावले, बघ्यांच्या गर्दीमुळे मदतकार्यात अडथळा
March 29, 2026
0