ईशान्येश्वर महादेव मंदिर... जिथे रोज व्हीआयपी आणि सेलिब्रिटींचा राबता असायचा, शंभर ते दीडशे भाविक रोज दर्शनासाठी यायचे.. तिथे आज कॅप्टनचे कारनामे उघड होताच सलग अकराव्या दिवशी शुकशुकाट आहे. मंदिरात यायलाही आता भाविक धजावत नसल्याचे गंभीर चित्र ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. मुख्य म्हणजे, या सर्व प्रकरणाचा बळी मंदिराचा पुजारी ठरला आहे. ४ वर्षांपासून या मंदिरात सेवा करणाऱ्या पुजाऱ्यांनीच आता एक क्षणही इथे थांबण्याची इच्छा नसल्याचे बोलून दाखवले, त्यामुळे भोंदूगिरीच्या पडद्यामागची अनेक विदारक सत्य समोर आली आहेत. मिरगावात या भव्य मंदिराची २०२२ पासून धुरा सांभाळणाऱ्या शर्मा नामक पुजाऱ्यांना या भोंदूबाबाने कधीही मुख्य पूजेला बसवलेच नाही. धक्कादायक बाब म्हणजे, व्हीआयपी किंवा सेलिब्रिटी आल्यावर नक्की काय पूजा व्हायची, हे खुद्द पुजाऱ्यालाच माहीत नाही. खरातला भेटणाऱ्या ३९ आमदारांची यादी जाहीर करा: विजय वडेट्टीवार नागपूर | शिंदेसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्याने राजकारणात नवा भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरातला ३९ आमदार भेटले असताना फक्त माझेच नाव का घेतले जाते, असे केसरकर यांनी म्हटले होते. यावरूनच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केसरकरांनी ३९ आमदारांची यादी जाहीर करावी, असे केले. खरातच्या कारनाम्यांचा पेनड्राइव्ह उघड केला, तर महाराष्ट्र सरकारला हादरा बसेल. शिवाय मोठ्या माशांना वाचवण्यासाठी खरातचं बरंवाईट करून पुरावे नष्ट केले जातील, अशी भीती वडेट्टीवारांनी व्यक्त केली. मुलीच्या लग्नाच्या चिंतेने झोप उडाली पुजारी शर्मा यांच्याशी संवाद साधल्यावर त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मूळचे जबलपूर (मध्य प्रदेश) येथील असलेल्या शर्मा यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी २१ वर्षांची असून तिच्या लग्नाची बोलणी सुरू होती. “कॅप्टनवर मोठा आदर होता, पण आता तोंड दाखवायला जागा उरली नाही. या प्रकरणामुळे माझ्या मुलीच्या लग्नात अडथळे येतील, या चिंतेने मला रात्रभर झोप येत नाही, माझं मन स्वत:लाच खातंय’, असे ते रडवेल्या स्वरात म्हणाले. मात्र, या संवादादरम्यान कॅप्टनची भीती त्यांच्या प्रत्येक शब्दांत जाणवत होती. मंदिरामध्ये दोन एसी, इम्पोर्टेड पंखे आणि हायटेक सुविधा उपलब्ध दोन एसी, इम्पोर्टेड पंखे आणि हायटेक सुविधा असलेल्या या मंदिरात आज एकही भाविक फिरकत नाही. एकेकाळी जिथे १००-१५० भाविकांची गर्दी असायची, तिथे आता केवळ शांतता आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील पाय धुण्याची व्यवस्था बंद पडली असून. गाव आणि बाजारपेठेपासून ८-१० किमी दूर असलेल्या या मंदिरात आता पुजाऱ्याला आपल्या उदरनिर्वाहाची आणि पगाराचीही चिंता सतावते आहे. पूर्वी त्याला ट्रस्टकडून १६ हजार रुपये दरमहा दिले जात होते. मात्र, आता साधी विचारपूस करायलाही कुणी नाही, अशी परिस्थिती आहे. ‘मला गावी जायचंय, पण...’ मला याच क्षणी गावी जायचं आहे, पण पोलिस चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी गाव सोडू शकत नाही. ४ वर्षे सेवा केली, पण आता इथे एक क्षणही थांबण्याची इच्छा नाही. इथे कुणीही फिरकत नाही, मी काय खाणार आणि कुटुंबाला काय पाठवणार, असे एक ना अनेक प्रश्न मला सतावत आहेत. - शर्मा पुजारी, ईशान्येश्वर महादेव मंदिर
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/FYbsdpV
चार वर्षांपासून मंदिराचे मुख्य पुजारी, तरीभाेंदूबाबाच करायचा व्हीआयपींच्या पूजा:ईशान्येश्वर महादेव मंदिरात सेलिब्रिटींचा वावर संपला
March 29, 2026
0