Type Here to Get Search Results !

नांदगाव खंडेश्वरमध्ये 271 युवकांना मिळाली नोकरी:द ग्रॅज्युएट फाउंडेशनने आयोजित केला रोजगार महोत्सव, 122 जणांना नियुक्तीपत्रे

नांदगाव खंडेश्वर येथे द ग्रॅज्युएट फाउंडेशनने आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवात २७१ सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला. ग्रामीण भागातील युवकांना त्यांच्या गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. यापैकी १२२ उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत, तर उर्वरित उमेदवारांना लवकरच नियुक्तीपत्रे पाठवली जातील. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रथमच अशा प्रकारचा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याने युवकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. 'कंपन्या आपल्या दारी' या संकल्पनेतून विविध नामांकित कंपन्यांना थेट नांदगाव खंडेश्वर येथे आणण्यात आले. यामुळे ग्रामीण युवकांना मोठ्या शहरांमध्ये न जाता स्थानिक पातळीवरच मुलाखती देण्याची आणि रोजगार मिळवण्याची संधी मिळाली. या नोकरी महोत्सवात एकूण ७३५ उमेदवारांनी नोंदणी करून विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमोर मुलाखती दिल्या. त्यापैकी २७१ उमेदवारांची निवड करण्यात आली. फुकोक इंडिया लि. (चाकण, पुणे), जाधव गिअर लि. (अमरावती), धूत ऑटोमोटिव्ह सिस्टिम्स प्रा. लि. (संभाजीनगर), ऑटो कॉम्पोनंट्स प्रा. लि., इलेक्ट्रिकल सिस्टिम प्रा. लि., ईगल हाय-टेक इंडस्ट्रियल प्रा. लि. (संभाजीनगर), प्रिसिजन मॅपिंग लि., सनसेट पॉवर सोल्युशन्स प्रा. लि., एम. के. किचन प्रा. लि. (अमरावती) या नामांकित कंपन्यांनी या महोत्सवात सहभाग घेतला. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. निकु खालसा होते. नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष मोहम्मद जमीर, नगरसेवक अक्षय पारस्कर, योगेश चव्हाळे, वासुदेव लोखंडे, मोहम्मद साजिद, अविनाश ब्राम्हणवाडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. द ग्रॅज्युएट फाउंडेशनचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. नितीन टाले यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. बेरोजगारी कमी करण्यासाठी समाजाने एकत्र येऊन सकारात्मक उपक्रम राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. आशिष बोरकर व प्रा. गजानन काकडे यांनी केले, तर प्रा. रुपेश फुके यांनी आभार मानले. ग्रामीण भागातील युवकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यात मोठ्या प्रमाणावर राबवण्यात यावेत, अशी अपेक्षा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/TJDlVcQ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.