मराठवाडा म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो पाचवीला पुजलेला दुष्काळ. पण याच मातीत जिद्द असेल तर काय घडू शकते, याचे उत्तम उदाहरण लातूरच्या एका तरुण शेतकऱ्याने घालून दिले. निलंगा तालुक्यातील तांबाळा येथील नरसिंग मल्लिकार्जुन लंगोटे या शेतकऱ्याने आपल्या 35 एकर खडकाळ माळरानावर 12 हजार केशर आंब्यांची लागवड केली. विशेष म्हणजे, या वर्षी केवळ 6 हजार झाडांतून त्यांना 1 कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न अपेक्षित आहे. नरसिंग लंगोटे यांनी केलेल्या या अफलातून प्रयोगाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. त्यामुळे तरुण शेतकऱ्यानाही एक आशेचा किरण दिसतोय. नरसिंग लंगोटे यांचा हैदराबाद येथे हॉटेल व्यवसाय होता. मात्र, कोरोना महामारीत तो बंद पडला. खचून न जाता ते गावी परतले आणि खडकाळ जमिनीला सुवर्णभूमी बनवण्याचे स्वप्न पाहिले. "पोखरा' आणि "भाऊसाहेब फुंडकर' सारख्या शासकीय योजनांची जोड घेत त्यांनी 2022 मध्ये रत्नागिरीहून 6 हजार केशरची रोपे आणली. हा प्रयोग यशस्वी होताना पाहून 2024 मध्ये पुन्हा 6 हजार रोपांची भर घातली. आज त्यांच्या तांबाळा येथील सर्वे नंबर 559 वर 12 हजार झाडांची डौलदार बाग उभी आहे. तंत्रज्ञानाची जोड आणि जागतिक भरारी केवळ पारंपरिक पद्धतीने शेती न करता नरसिंग यांनी ठिबक सिंचन, खतांचे अचूक नियोजन आणि कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा अवलंब केला. चार वर्षात त्यांना एक ते सव्वा कोटींपर्यंत खर्च लागला. गेल्या वर्षी त्यांना केवळ 1 हजार झाडांपासून 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यंदा 6 हजार झाडे फळांनी लगडली असून मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील व्यापारी बबलू आजम यांनी थेट शेतात येऊन 140 रुपये किलो दराने आंबा खरेदी केला. हा आंबा आता दुबई, लंडन, अमेरिका आणि जर्मनीच्या बाजारपेठांत सातासमुद्रापार जाणार असल्याचे आजम यांनी सांगितले. यंदा त्यांनी केलेला एक कोटींचा खर्च निघणे अपेक्षित आहे. जगातील सर्वात महागडा 'मियाझाकी' आता लातुरात नरसिंग यांनी केवळ केशरवर न थांबता जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानी 'मियाझाकी' जातीची लागवडही केली आहे. सुरुवातीला 10 झाडे त्यांनी मागवली व नंतर 150 रोपांची त्यात भर घातली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात 2 ते 3 लाख रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या या आंब्याची झाडे त्यांनी थेट विमानाने आयात केली आहेत. (प्रगतिशील शेतकरी नरसिंग लंगोटे यांचा संपर्क क्रमांकः 9399945551)
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/9HfzdPk
प्रगतिशील शेतकरी:दुष्काळी माळरानावर केशर आंब्याची बाग; 35 एकरांतून 1 कोटी उत्पन्न, लातूरच्या शेतकऱ्याचा जिद्दी प्रयोग
May 10, 2026
0