छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात भरदिवसा दोन गटांमध्ये झालेल्या रक्तरंजित हाणामारीत एका 25 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून, भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड पोलिस ठाण्यासमोर असलेल्या रेणुका ज्वेलर्सच्या परिसरात या दोन गटांमध्ये अचानक वाद उफाळून आला होता. सुरुवातीला झालेली शाब्दिक बाचाबाची अल्पावधीतच हिंसक झाली आणि दोन्ही गटांनी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी हल्ले करण्यास सुरुवात केली. याच प्राणघातक हल्ल्यात नविद शेख अकरम (वय 25) या तरुणावर गंभीर वार झाल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला. पोलिस आता या हल्लेखोरांचा शोध घेत असून प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत. जखमी अकरमचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू हल्ल्यानंतर जखमी अकरमला वाचवण्यासाठी नातेवाईकांनी मोटरसायकलवरून रुग्णालयात नेण्याची धडपड केली. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अनपेक्षित घटनेमुळे अकरमच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या प्राणघातक हाणामारीत आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलीस त्याचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न करत आहेत. थरार सीसीटीव्हीमध्ये कैद भररस्त्यात घडलेला हा संपूर्ण रक्तरंजित थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. या फुटेजमध्ये हल्लेखोरांनी केलेली अमानुष मारहाण आणि उडालेला गोंधळ स्पष्टपणे दिसत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतले असून, या भक्कम पुराव्यांच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवून पुढील तपास वेगाने सुरू केला आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/RyipboJ
छत्रपती संभाजीनगर हादरले!:कन्नडमध्ये भररस्त्यात धारदार शस्त्रांनी हल्ला, चाकू हल्ल्यात 25 वर्षीय तरुणाची हत्या
June 15, 2026
0