पुणे जिल्ह्यातील गावोगावी जाऊन सोनोग्राफीद्वारे महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून, डॉक्टसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केले आहेत. त्यांच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना केले आहेत. याप्रकरणी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलिस निरीक्षक नारायण देशमुख उपस्थित होते. आण्णासाहेब गिरी (रा. केंडगाव, ता. दौंड, मूळ रा. पारनेर, जि. नगर) याला २० मे रोजी अटक केली आहे. तर डॉक्टर अतुल अंकुश जाधव (रा. लोहगाव), नरेंद्र साहेबराव ठाकरे (रा. केसनंद, ता. हवेली), मंदार सुरेश माळी (रा. किकवी, ता. भोर) आणि सुंदरम कदम (रा. उरुळीकांचन, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी केडगाव परिसरात गर्भलिंग निदान प्रकरणात कारवाई करत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. फिर्यादी डॉ. सचिन विठ्ठल गुजर यांना १७ मे रोजी एकाने महिलेचे गर्भलिंग निदान करत असल्याचा व्हिडिओ पाठवला होता. या व्हिडिओच्या आधारे १९ मे यवत पोलिस ठाण्यात त्यांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान आरोपी आण्णासाहेब गिरी याने नरेंद्र ठाकरे याच्याकडून सोनोग्राफी मशीन घेतल्याचे निष्पन्न झाले. मुख्य आरोपी गिरी याला अटक केल्यानंतर गुन्ह्यात अतुल जाधव (रा. लोहगाव), नरेंद्र ठाकरे (रा. केसनंद, ता. हवेली), मंदार माळी (रा. किकवी, ता. भोर) सुंदरम कदम (रा. उरुळीकांचन) यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. तसेच जप्त केलेल्या व्हिडिओंची पडताळणी केल्यानंतर आरोपी आण्णासाहेब गिरी स्वतः गर्भलिंग निदान करत असल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. आरोपींच्या बँक खात्यांचे व्यवहार, मोबाईल सीडीआर आणि इतर तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण सुरू आहे. आरोपी गिरी १२ वी पास अन् करत होता गर्भलिंग तपासणी आरोपी अण्णासाहेब गिरी हा बारावी पास असून त्याने बी फार्मसीसाठी प्रवेश घेतला होता. मात्र, ते शिक्षण त्याने पूर्ण केले नाही. त्यानंतर एका आयुर्वेदिक डॉक्टरसाठी एमआर म्हणून त्याने काम पाहिले. गिरीने आणखी दोन जिल्ह्यात अशाच प्रकारे बेकायदेशीर रित्या गर्भलिंग निदान तपासणी केली आहे. गिरी हा गावोगावी महिलांची गर्भलिंग निदानची तपासणी करत होता. प्रत्येकी ४० ते ६० हजार तो फीस घेत होता.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/7dubWQ6
पुणे जिल्ह्यात गावोगावी जाऊन गर्भलिंग निदान:रॅकेट पकडले, आरोपीला अटक करून मशीन जप्त, इतरांचा शोध सुरू
June 03, 2026
0