गत जानेवारी महिन्यात बारामती विमान तळावर झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर माळी कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र चार महिने उलटूनही हे कुटुंब मदतीसाठी प्रशासकीय आणि कंपनीच्या स्तरावर संघर्ष करत असल्याचे समोर आले आहे. आमदार रोहित पवार यांनी या मुद्द्यावरून सरकार आणि संबंधित कंपनीवर गंभीर आरोप केल्यानंतर आता पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी यांनी आपली कैफियत मांडली आहे. रोहित पवार यांनी ट्विटद्वारे असा आरोप केला होता की, पिंकी माळी यांच्या कुटुंबाला अद्याप मुख्यमंत्री सहायता निधी मिळालेला नाही. तसेच, व्हीएसआर ही कंपनी पिंकी यांच्या विम्याचे (इन्शुरन्स) पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. यावर बोलताना शिवकुमार माळी म्हणाले की, "रोहित पवार वेळोवेळी आमची विचारपूस करतात आणि आमची समस्या मांडल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे". नेमके काय म्हणाले शिवकुमार माळी? शिवकुमार माळी यांनी 'टीव्ही ९ मराठी'शी बोलताना कंपनीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, VSR कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांनी फोन करून 'अंतरिम रक्कम' घेण्याची विचारणा केली होती. मात्र, एकूण विमा किती मिळणार आणि पिंकीचे हक्काचे मानधन किती आहे?, याची माहिती कंपनीकडून दिली जात नाही. "मुलगी तर राहिली नाही, पण किमान तिचे हक्काचे मानधन किती? ते तरी आम्हाला सांगावेत. विमा प्रक्रियेला चार महिने लागतात का?" असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीवरून नाराजी पिंकी माळीच्या वडिलांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या मदतीबाबतही त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. बारामतीमधून सोनवणे नावाच्या व्यक्तीने फोन करून ५ लाख रुपयांची मदत जाहीर झाल्याचे सांगितले होते. यावर शिवकुमार माळी यांनी स्पष्ट केले की, ५ लाख रुपयांची मदत अत्यंत अपुरी असून ती घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. मदत वाढवून मिळावी यासाठी त्यांनी शासनस्तरावर पत्रव्यवहार केला आहे, परंतु अद्याप त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. "आम्हाला मदत वाढवून मिळावी हीच आमची अपेक्षा आहे, पण सध्यातरी काहीच दिसत नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली. नेमके काय म्हणाले होते रोहित पवार? पिंकी माळीच्या कुटुंबियांना अद्याप मदत न मिळाल्यामुळे रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला होता. ते म्हणाले, “अजितदादांच्या दुर्देवी अपघातात दादांसह मृत्यू झालेल्या पिंकी माळी व विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांना VSR कंपनीकडून जो इन्शुरन्स देण्यात येणार होता त्याबाबत VSR कडून सातत्याने टाळाटाळ होत असून सरकारकडून त्या कंपनीच्या मालकाशी संपर्क करून जाधव व माळी कुटुंबाला विम्याचे पैसे देण्यासंदर्भात प्रयत्न होंत नाहीत हे दुर्दैवी आहे. सरकारकडून दोन्ही पिडीत कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत जाहीर केली होती ती मदतदेखील या कुटुंबांना मिळालेली नाही.” रोहित पवार म्हणाले, “अपघाताचा तपास आणि लढा आम्ही आमच्या पद्धतीने लढूच, दादांच्या अपघाताचा तपास बघता सरकारने अजितदादांना वाऱ्यावर तर सोडलेच किमान आता या कुटुंबांना तरी वाऱ्यावर सोडू नका. सरकारने पिंकी माळी व विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांशी तात्काळ संवाद साधून त्यांना येत असलेल्या अडचणी सोडवाव्यात, दोन्ही कुटुंबांना VSR कडून तसेच सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत करावी. तसेच अजितदादांच्या अपघाताचे सत्य समोर यावे यासाठी देखील प्रयत्न करावेत...!”
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/iqn8gKT
पिंकी माळींच्या कुटुंबीयांची मदतीसाठी वणवण:मुख्यमंत्री सहायता निधी आणि विम्याच्या पैशांवरून शिवकुमार माळी यांची खदखद
June 03, 2026
0