Type Here to Get Search Results !

शिक्षण मंत्र्यांकडून डॉ. पंजाबराव देशमुख संकुलाच्या जागेची पाहणी:राज्य सरकारची मंजुरी; डिसेंबरमध्ये निधी तरतुदीचे प्रयत्न

अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी रविवारी प्रस्तावित जागेची पाहणी केली. राज्य शासनाने या संकुलाला मंजुरी दिली असून, डिसेंबरमध्ये निधीची तरतूद करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषी आणि शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नावाने अमरावती येथे शैक्षणिक संकुल उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पाहणीदरम्यान, मंत्री डॉ. भोयर यांनी संबंधित यंत्रणेला संकुलाचा सविस्तर प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवण्याचे निर्देश दिले. हा प्रस्ताव लवकर मिळाल्यास आगामी हिवाळी अधिवेशनात निधीची तरतूद करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. मार्चमध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पात या संकुलाची घोषणा करण्यात आली होती. काही विभागांचा अखर्चित निधी संकुलासाठी वळवला जाऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अमरावती येथील एका कार्यक्रमात या संकुलाच्या बांधणीला अंतिम मंजुरी मिळाली होती. या संकुलासाठी मध्यवर्ती बसस्थानकाजवळील जुन्या डी.एड. कॉलेजची जागा (सायंस्कोर शाळेच्या उजव्या बाजूच्या रस्त्यालगतचा परिसर) प्रस्तावित आहे. संबंधित अधिकाऱ्यांसोबत त्यांनी आज सकाळी या जागेची पाहणी करून पुढील सूचना दिल्या. संकुलाची इमारत भव्यदिव्य असावी, तसेच येथे कॉन्फरन्स रूम आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असावी, अशा सूचना डॉ. भोयर यांनी दिल्या. सध्या तेथे असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामाबाबत पुनर्विचार करावा, असेही त्यांनी सूचित केले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/mJoNyCg

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.