नागपूरच्या धंतोली परिसरातून बेपत्ता झालेल्या परसवानी कुटुंबाचे गूढ अखेर अकरा दिवसांनंतर उकलले आहे. हे संपूर्ण कुटुंब पुण्याच्या पिंपरी-चिंचवड परिसरात सुरक्षित असून, एका ऑनलाइन ‘जी-पे’ व्यवहारामुळे पोलिसांना त्यांचा शोध घेता आला. धंतोलीतील दुर्गा सदन इमारतीत राहणारे जितेंद्र परसवानी, हर्षा परसवानी, इशिता, खुशी आणि कृष्णा हे पाच जण २४ जूनपासून अचानक बेपत्ता झाले होते. सर्वांचे मोबाइल फोन बंद असल्याने पोलिसांना घातपाताचा संशय होता. तपासादरम्यान पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणात या कुटुंबाने पिंपरी-चिंचवड भागात ऑनलाइन पेमेंट केल्याचे समोर आले. हे कुटुंब केवळ आर्थिक व्यवहार करताना काही सेकंदांसाठी मोबाइलचा इंटरनेट डेटा सुरू करत होते. त्यांच्या याच डिजिटल चुकीमुळे पोलिसांना त्यांचे लोकेशन मिळवण्यात यश आले. नागपूर पोलिसांचे एक पथक आता पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाले असून, लवकरच या कुटुंबाला नागपुरात परत आणण्यात येणार आहे. कर्जाचा डोंगर व कौटुंबिक वादातून कृत्य जितेंद्र परसवानी यांच्यावर मोठे कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठी ते स्वतःच्या वाटणीची मालमत्ता विकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, भावांमधील कौटुंबिक आणि कायदेशीर वादामुळे ही विक्री रखडली होती. याच आर्थिक विवंचनेतून त्यांनी कुटुंबासह पलायन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. परसवानी कुटुंबातील पाच भावांमध्ये दुरावा असल्याने नातेवाइकांनाही त्यांच्या या परिस्थितीची फारशी कल्पना नव्हती, असे सूत्रांनी सांगितले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/zXHDsnS
नागपूरमधून 11 दिवसांपासून बेपत्ता परसवानी कुटुंब सापडले:कुटुंब पिंपरी-चिंचवड परिसरात सुरक्षित, एका ऑनलाइन ‘जी-पे’ व्यवहारामुळे पोलिसांना लागला शोध
July 07, 2026
0