जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथील प्रयोगशील शेतकरी विकास हरिभाऊ चव्हाण यांनी सेंद्रिय कर्ब संवर्धन, पाचट व्यवस्थापन आणि ‘सुपरकेन’ रोपवाटिका तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ साधली आहे. त्यांच्या ४० एकर शेतीमध्ये प्रति एकर सरासरी ८२ टन ऊस उत्पादन मिळत आहे. एका हंगामात एकरी सुमारे २ लाख ३० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. उत्पादन खर्च सुमारे ७० हजार रुपयांपर्यंत येतो. विकास हे २०१४ पासून ‘सुपरकेन’ नर्सरी तंत्रज्ञानाचा प्रयोग करत आहेत. यापूर्वी पारंपरिक पद्धतीने ऊस शेती करताना त्यांना प्रति एकर ६५ ते ७० टनांपर्यंत उत्पादन मिळत होते. मात्र, बी.एस्सी. ॲग्रीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी परिसरातील शेतीचा इतिहास आणि जमिनीच्या सुपीकतेचा अभ्यास करून डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांच्या तंत्रज्ञानावर आधारित ‘सुपरकेन रोपवाटिका’ संकल्पनेचा अवलंब केला. शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गादीवाफ्यावर सशक्त ऊस रोपे तयार करून त्यानंतर शेतात लागवड करायची, अशी ही पद्धत आहे. रोपे तयार होईपर्यंत शेतात पाटाचे पाणी देण्याची आवश्यकता नसल्याने त्यांच्या ४० एकर क्षेत्रात सुमारे दीड कोटी लिटर पाण्याची बचत झाली आहे. काय आहे ‘सुपरकेन’ रोपवाटिका? ‘सुपरकेन’ रोपवाटिका म्हणजे कमी खर्चात, कमी पाण्यात आणि कमी बियाण्याचा वापर करून शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गादीवाफ्यावर तयार केलेली ऊस रोपवाटिका होय. या पद्धतीत एक डोळ्याच्या टिपऱ्यांची निवड करून त्यावर बेणे प्रक्रिया केली जाते. सुमारे सहा फूट रुंद आणि ५० फूट लांबीच्या सपाट वाफ्यामध्ये डीएपी किंवा सुपर फॉस्फेटच्या रिकाम्या पिशव्या अंथरल्या जातात. त्यावर सुमारे दोन इंच मातीचा थर देऊन एक डोळ्याच्या टिपऱ्यांची लागवड केली जाते. त्यानंतर टिपऱ्यांवर झाकण होईल एवढा मातीचा थर देऊन प्रवाही पद्धतीने पाणी दिले जाते. अशा पद्धतीने एका एकरासाठी आवश्यक असणारे ऊस बियाणे तयार करता येते. सरासरी एकरी दुप्पट निघते उत्पादन पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा ऊस या प्रकारांनुसार उत्पादनाचा कालावधी आणि उत्पादकता बदलते. पश्चिम महाराष्ट्रात सरासरी प्रति एकर ३८ ते ४२ टन ऊस उत्पादन मिळत असताना, विकास चव्हाण यांनी सेंद्रिय कर्ब संवर्धन, पाचट व्यवस्थापन, योग्य बेणे आणि ‘सुपरकेन’ रोपवाटिका तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रति एकर सरासरी ८२ टनांपर्यंत ऊस उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. शेतकरी मोबाइल नंबर : 9503205483
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Dwgb3qo
प्रगतिशील शेतकरी:सेंद्रिय कर्ब संवर्धनातून प्रति एकर 82 टन ऊस उत्पादन, जुन्नरमधील शेतकऱ्याचा ‘सुपरकेन’ तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग
July 26, 2026
0