Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्र्यांनी घेतली नवीन पाणी योजनेची बैठक:नवी तारीख दिली तर लोक आम्हाला मारायला कमी करणार नाहीत- शिरसाट

शहराच्या रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेवरून बुधवारी (१५ जुलै) मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मोठा तणाव पाहायला मिळाला. या वेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पाणी योजनेला पुन्हा नवीन तारीख दिली तर लोक आम्हाला मारायलाही कमी करणार नाहीत, अशी उद्विग्न भावना व्यक्त करत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांच्या आणि कंत्राटदाराच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त करत खरडपट्टी काढली. मुख्यमंत्र्यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे बैठकीला उपस्थित असलेल्या नेते व अधिकाऱ्यांचे चेहरे उतरले होते. या वेळी मंत्री अतुल सावे यांनीही शहरातील नागरिकांना पाण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना कसरत करावी लागते असे सांगितले. खासदार संदिपान भुमरे यांनी पैठण रस्त्यावरील व्हॉल्व्हमुळे होणाऱ्या अपघाताचा मुद्दा उपस्थित करत बॅरिकेडिंगची मागणी केली. महापौर समीर राजूरकर यांनी वाढीव पाणी द्यावे, अशी मागणी या बैठकीत केली. मात्र वाढीव पाणी कधी देणार आणि योजना कधी पूर्ण करणार, हा प्रश्न अद्यापही कायम आहे. मुख्यमंत्र्यांनी खरडपट्टी सुरू करताच लोकप्रतिनिधींनीही मान खाली घातली या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी खरडपट्टी केली. ८ ते १० दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचा संताप सहन करावा लागत असल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले. एमजेपीचे अधिकारी सहकार्य करत नसल्याची तक्रार कंत्राटदाराने केली, तर कंत्राटदार काम करताना दर्जा ठेवत नाही आणि आमचे ऐकत नसल्याची तक्रार एमजेपीने केली. हा आरोप-प्रत्यारोपांचा प्रकार मुख्यमंत्र्यांसमोरच सुरू असल्याने त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींना शरमेने मान खाली घालावी लागली. मुख्यमंत्री आठवड्यानंतर घेणार पुन्हा आढावा या पाणी योजनेचा पुन्हा ७ दिवसांनी मुख्यमंत्री फडणवीस आढावा घेणार आहेत. त्यामुळे मंत्रालयातील संबंधित विभागाचे २ सचिव २ दिवस शहरात येऊन योजनेचा आढावा घेणार आहेत. यामध्ये कंत्राटदाराने केलेल्या चुका, मनपा, एमजेपीमध्ये नसलेला समन्वय याचा आढावा घेतला जाणार आहे. सोबतच अडचणी काय आहेत आणि त्यावरील उपाययोजनांबाबतही अभ्यास करण्याचे आदेश या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/mKqbdL1

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.