Type Here to Get Search Results !

आईची 15 दिवसांच्या चिमुकल्यासह त्रिवेणी तलावात आत्महत्या:वडील म्हणाले, तापामुळे ती काही दिवसांपासून बडबडत होती

मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील अंबाडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पूजा प्रवीण डाहे या विवाहित महिलेने आपल्या १५ दिवसांच्या चिमुकल्यासह गावाजवळील त्रिवेणी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडली असून, बुधवारी सकाळी उघडकीस आली. मृत पूजा डाहे या दर्यापूर तालुक्यातील सांगवा येथील रहिवासी होत्या. प्रसूतीसाठी त्या अंबाडा येथील आपल्या माहेरी आल्या होत्या. सुमारे १५ दिवसांपूर्वीच त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला होता, ज्याचे नाव पियुष प्रवीण डाहे असे होते. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, पूजा गेल्या काही दिवसांपासून तापाने फणफणली होती. तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, तापामुळे ती काही दिवसांपासून असंबंध बडबड करत होती आणि तिच्यावर उपचारही सुरू होते. याच परिस्थितीत, कुणालाही काहीही न सांगता, पूजा पहाटे घरातून निघून गेली. बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तिने आपला १५ दिवसांचा चिमुकला पियुष याला सोबत घेऊन त्रिवेणी तलावावर जाऊन बाळासह तलावात उडी घेतली असा अंदाज आहे. बुधवारी सकाळी पूजा आणि बाळ घरात न दिसल्याने वडील शंकरराव नांदणे यांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी त्यांना त्रिवेणी तलावात महिलेचा मृतदेह तरंगताना दिसल्याचे कळले. त्यानंतर मच्छीमारांच्या मदतीने पूजा डाहे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मोर्शी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तलावात पूजा डाहे यांचा मृतदेह लवकर सापडला, मात्र बाळाचा (पियुष डाहे) मृतदेह शोधण्यासाठी मच्छीमारांना तब्बल सहा तास लागले. मोर्शी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/6dXf1hM

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.