नेपाळ व चीन सीमाभागात महापुराच्या नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या महाराष्ट्रातील आणखी ६९ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला मोठे यश आले आहे. या सर्व पर्यटकांनी चीनच्या कोदारी इमिग्रेशन केंद्रावरून नेपाळमध्ये प्रवेश केला असून ते ३१ ऑगस्टपर्यंत मुंबईत सुखरूप परतणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या थेट पाठपुराव्यामुळे आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने परराष्ट्र मंत्रालय व जिल्हा प्रशासनाशी चोख समन्वय ठेवून ही मोहीम वेगाने राबवली. एकूण ४०४ पर्यटक अडकल्याची प्राथमिक नोंद होती. यापूर्वी १४२ पर्यटकांना सुखरूप आणण्यात आले होते, तर आता ६९ जण सुरक्षित आल्याने मायदेशी परतलेल्यांचा आकडा २११ वर पोहोचला आहे. उर्वरित १९३ पर्यटकांच्या सुरक्षित परतीसाठी शोध सुरू आहे. परराष्ट्र मंत्रालय, महाराष्ट्र सदन आणि जिल्ह्यांचे २४ तास नेटवर्क आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद सिंगल आणि संचालक भालचंद्र चव्हाण या मोहिमेवर थेट लक्ष ठेवून आहेत. एकात्मिक नियंत्रण कक्ष : नवी दिल्ली येथील आपत्कालीन नियंत्रण कक्ष, परराष्ट्र मंत्रालय आणि नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन यांच्याशी थेट संपर्क साधून ग्राउंड लेव्हलवर बचाव पथके तैनात केली आहेत. वेब-आधारित डेटा ट्रॅकिंग : कुटुंबीय व ट्रॅव्हल एजन्सींशी २४ तास समन्वय सुरू आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/IhP5a3A
नेपाळ-चीन सीमेवरील आपत्तीतून महाराष्ट्राच्या 69 पर्यटकांची सुटका:उर्वरित 193 जणांच्या परतीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न
August 30, 2026
0