वृक्षदिंडीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने (४ ऑगस्ट) रोजी छत्रपती शाहू महाराज इंग्लिश शाळेकडून भव्य वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहभागाने ही दिंडी उत्साहात काढण्यात आली. वृक्षदिंडीनंतर देवगाव रंगारी पोलिस स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थितांनी लावलेल्या वृक्षांचे उत्तम संगोपन करण्याचा संकल्प केला. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे देवगाव रंगारी पोलिस स्टेशन येथे विद्यार्थ्यांना पोलिसांच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली. पोलिस प्रशासनाने विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या रायफल्स व इतर शस्त्रांची माहिती दिली. त्यांचा सुरक्षित वापर कसा केला जातो हे प्रात्यक्षिकांसह दाखवले. समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाची भूमिका काय असते याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या उपक्रमात इरफान शेख, अर्चना भारद्वाज, रुपाली आधाने, दीक्षा पवार, हर्षदा हिवाळे, जगजीवन वंजारे, संतोष कोठारी, कविता कवाडे यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण झाली. अशी माहिती मुख्याध्यापिका जयश्री गिरी यांनी दिली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/GRi296Q
परिसरात वृक्षारोपण केले, विद्यार्थ्यांना पोलिस कार्याची दिली माहिती:परिसरात वृक्षारोपण केले, विद्यार्थ्यांना पोलिस कार्याची दिली माहिती
August 04, 2026
0