मराठवाड्याची इमर्जन्सी लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे दररोज हजारो गोरगरीब रुग्ण अत्यंत आशेने उपचारासाठी येतात. मात्र, सध्या घाटीमध्ये उपचाराच्या नावाखाली रुग्णांची निव्वळ हेळसांड सुरू असल्याचे दिव्य मराठी प्रतिनिधीच्या पाहणीत समोर आले. विशेष म्हणजे प्रतिनिधीने ताप आल्याचे सांगितल्यानंतर एक्स-रेचा सल्ला देण्यात आला. प्रतिनिधीने तो मान्य करून एक्स-रे विभाग गाठलाही; परंतु गळ्यात चांदीची चेन, खिशात मोबाइल अन् वॉलेट असतानाही तेथील कर्मचाऱ्यांनी कोणतीही तपासणी न करता एक्स-रे काढला अन् तोही अर्धवट दरवाजा उघडा ठेवून. हा प्रकार एवढ्यावरच संपला नाही तर प्रतिनिधीला एक्स-रेची प्रिंट किंवा फिल्म न देता रिपोर्ट मोबाइलवर शेअर करण्यात आला. प्रतिनिधीने संबंधित डॉक्टरांना तो रिपोर्ट दाखवल्यानंतर डॉक्टरांनी अवघ्या १० सेकंदांत ‘नॉर्मल आहे’चा शेरा मारून हात वर केले. ओपीडीच्या पावतीसाठी रुग्णांना लागतात ४५ मिनिटे, उपचार मात्र ३ मिनिटांत सकाळी १०.५६ वाजता प्रतिनिधी ओपीडीच्या नोंदणी रांगेत उभा राहिला. ३९ मिनिटांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ११.३५ वाजता नोंदणी खिडकीपर्यंत नंबर आला. येथे नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य असल्याचा कोणताही फलक वा सूचना लावलेली नव्हती. मात्र, रांगेतील रुग्णांच्या हातातील आधार पाहून प्रतिनिधीने मोबाइलमध्ये आधारचा फोटो काढून ठेवला होता. खिडकीतील कर्मचाऱ्याने हातानेच पैशांची आणि आधारची मागणी केली. “काय होतंय?’ एवढीच विचारणा करून दीड मिनिटात हातात फॉर्मवजा प्रिस्क्रिप्शनचा कोरा कागद टेकवला आणि त्यावर ‘१३०’ नंबरच्या खोलीत जाण्याचा शेरा मारला. वेळ संपली: ताटकळलेल्या रुग्णांच्या तोंडावर मेडिकलचे फाटक होते बंद ओपीडीनंतर प्रतिनिधी एक्स-रे विभागाकडे गेला.येथे लोकल ट्रेनसारखी गर्दी होती. नोंदणी कुठे करायची, रांग कोणती, एक्स-रे कुठे काढायचा याचा पत्ता लागत नव्हता. कर्मचाऱ्यांची गयावया करत नोंदणीची रांग गाठली. तेथे अर्धा तास रांगेत उभे राहिल्यानंतर “येथे छातीचा एक्स-रे होत नाही, वॉर्ड ११ मध्ये जा’जाण्यास सांगितले. तेथे खिशातील धातूचे सामान काढण्याची सूचनाही न देता प्रतिनिधीला तसेच एक्स-रे बेडवर झोपवले. खोलीचा दरवाजा अर्धा उघडा ठेवूनच महिला कर्मचाऱ्याने एक्स-रे काढला. एक्स-रे फिल्म किंवा प्रिंट देण्याऐवजी मोबाइल द्या’ म्हणून थेट मोबाइलवरच फोटो काढून दिला. त्या एक्स-रेमध्ये गळ्यातील साखळी होती. डॉक्टरांनी मोबाइलमधील एक्स-रेचा फोटो १० सेकंद बघून दिला नॉर्मलचा शेरा अपघात विभागातून पुन्हा ओपीडीमध्ये आल्यावर टेबलवरची गर्दी ओसरली होती. डॉक्टरांनी मोबाइलमधील एक्स-रेचा फोटो १० सेकंद पाहिला आणि “नॉर्मल आहे’ असे सांगत आधीच लिहिलेल्या गोळ्या घेण्यास फर्मावले. दुपारी १२.३७ वाजता औषधांसाठी प्रतिनिधी मेडिकलच्या रांगेत उभा राहिला. दर १० मिनिटाला पुढे जाण्यावरून वाद होत होते. दुपारी १.१६ वाजता समोर ३ रुग्ण उरले असताना आत बसलेल्या महिलेने काहीही न बोलता थेट तोंडावर खिडकी बंद केली. सुरक्षा रक्षकाने “मेडिकल आता ३ वाजता उघडेल’ असे उत्तर दिल्याने प्रतिनिधी बाहेर पडला. मात्र, रांगेत अद्यापही १०० रुग्ण उभे होते. एक्स-रेची फिल्म किंवा प्रिंट न देता थेट रुग्णाच्या मोबाइलवर रिपोर्ट शेअर केला एक्स-रे काढताना प्रतिनिधीच्या गळ्यात चांदीची चेन, पॅन्टच्या खिशात मोबाइल, पॉवर बँक, आय कार्ड, वॉलेट असा सर्व ऐवज होता. त्याला थेट एक्स-रेच्या बेडवर झोपण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर एक्स-रे मशीन अॅडजस्ट करून महिला कर्मचारी अर्धा उघडा दरवाजा ठेवूनच पलीकडच्या रूममध्ये गेल्या. काही क्षणांनी ‘दादा, झाले’ असा आवाज आला. त्यावर प्रतिनिधी उठून बाहेर गेला. विशेष म्हणजे, प्रिंट किंवा फिल्म देण्याऐवजी थेट रुग्णाच्या मोबाइलवरच फोटो काढून देण्यात आला. या फोटोमध्ये रुग्णाच्या गळ्यातील सोन्याची साखळी लखलखत असल्याचे स्पष्ट दिसले. थेट सवाल: डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) दागिन्यांसह एक्स-रे काढल्यास कारवाई दागिने न काढताच रुग्णांचा एक्स-रे काढला?
मुळीच नाही. मी स्वतः अधिष्ठाता असलो, तरी जेव्हा माझा एक्स-रे होतो तेव्हा मलाही चेन, अंगठी, पाकीट काढावेच लागते. असा प्रकार जर कुठे झाला असेल आणि त्याबाबत लेखी तक्रार आली, तर कारवाई करू. केवळ ताप आल्यावर रुग्णाला एक्स-रे काढण्यास सांगणे योग्य आहे का?
लक्षणांनुसार एक्स-रे सांगितला जातो. तसे केले असेल. १० सेकंदांत निदान करून उपचार सांगितला?
ज्युनियर डॉक्टर्सनी ६ वर्षांचा अभ्यास केलेला असतो. प्रत्येक रुग्णाला वरिष्ठ डॉक्टर पाहू शकत नाहीत. अतिजोखमीचे रुग्ण निश्चितपणे वरिष्ठ डॉक्टरांनीच पाहायला हवेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/1kbM4FK
दिव्य मराठी स्टिंग:अघोषित आधार सक्ती अन् एक्स-रे विभागात लोकलसारखी गर्दी; ताटकळलेल्या रुग्णांच्या तोंडावर मेडिकलचे फाटक बंद
August 28, 2026
0