Type Here to Get Search Results !

लाचखोरी आणि रखडलेल्या बिलांनी घेतला कंत्राटदाराचा बळी!:नांदेडच्या ठेकेदाराची मुंबईत गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

राज्यातील कंत्राटदारांची शासकीय देणी प्रलंबित असल्याने कंत्राटदार संघटनांकडून वारंवार ती मिळण्याची मागणी होत आहे. मात्र, वेळेवर बिले न निघाल्याने आर्थिक भार सहन न करू शकणारे काही ठेकेदार टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या दुर्दैवी घटना राज्यात घडत आहेत. सांगलीतील एका कंत्राटदाराच्या आत्महत्येनंतर आता नांदेड जिल्ह्यातील मुखेडचे रहिवासी असलेले कंत्राटदार गजानन देवकते यांनी मुंबईत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. अधिकाऱ्यांकडून बिले काढण्यासाठी होत असलेल्या लाचेच्या मागणीला कंटाळून त्यांनी ही आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. गजानन देवकते हे मुंबईत गुत्तेदारीची (कंत्राटी) कामे करत होते. या कामांसाठी त्यांनी तब्बल दीड कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली होती. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम उभी करण्यासाठी त्यांनी केवळ व्याजाने पैसेच घेतले नव्हते, तर आपल्या पत्नीचे आणि वृद्ध आईचे दागिनेही गहाण ठेवले होते. एवढी मोठी जोखीम पत्करून आणि काम वेळेवर पूर्ण करूनही त्यांना त्यांचे देयक (बिल) वेळेवर मिळत नव्हते, ज्यामुळे ते मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. अधिकाऱ्याकडून लाचेची मागणी या संपूर्ण प्रकरणात मयत गजानन यांच्या पत्नीने प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. कामाचे देयक काढण्यासाठी भूषण फेडगे नावाच्या अधिकाऱ्याने 5 लाख रुपयांची लाच मागितल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या अधिकाऱ्याने यापूर्वीही अनेकदा लाचेची मागणी केल्याचे त्यांच्या पत्नीचे म्हणणे आहे. लाच न दिल्यास बिल न काढण्याच्या या अडवणुकीमुळेच देवकते यांच्यावर ही वेळ ओढवल्याचे सांगत, या अधिकाऱ्याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबाने केली आहे. कर्जाचा डोंगर आणि मानसिक तणाव कंत्राटाच्या कामासाठी बाजारातून घेतलेले मोठे कर्ज आणि त्यावर सतत वाढणारे व्याजाचे ओझे यामुळे देवकते आधीच चिंतेत होते. त्यातच हक्काचे काम पूर्ण करूनही देयक रखडल्याने त्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली होती. कर्जदारांचा वाढता तगादा आणि प्रशासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांची अडवणूक यामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली आणि नैराश्यात गेले होते. याच आर्थिक विवंचनेतून कोणताही मार्ग न सापडल्याने अखेर त्यांनी मुंबईत गळफास घेऊन आपले जीवन संपवले. उघड्यावर आलेले कुटुंब आणि न्यायाची अपेक्षा गजानन देवकते यांच्या या अनपेक्षित जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले आणि एक वृद्ध व आजारी आई असा परिवार असून, कुटुंबाचा मुख्य आधारच हिरावला गेल्याने हे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. या अत्यंत संवेदनशील प्रकरणात राज्य शासनाने तातडीने लक्ष घालून निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर कडक कारवाई करावी आणि निराधार झालेल्या या कुटुंबाला आर्थिक मदत व न्याय मिळवून द्यावा, अशी आर्त मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/OrD9SGR

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.