Type Here to Get Search Results !

यशाधिपतीः9 महिन्यांची असताना आई-वडिलांनी जग सोडले:नैराश्यात MPSC ऐवजी लग्नाचा विचार केला, अखेर जिद्दीच्या बळावर नीलम STI अधिकारी झाली!

ती अवघ्या 9 महिन्यांची. तेव्हाच आई-वडिलांचे छत्र हरवले. मामाने सांभाळ केला. त्याची परिस्थितीही बेताची. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अपयशाने पिच्छा पुरवला. एकदा तर मुख्य परीक्षा फक्त तीन मार्कांनी गेली. ती पूर्णपणे आतून खचली. तिनं आता MPSC करायचंच नाही, असा निर्णय घेतला. हा निकाल संध्याकाळी सहा वाजता समजला. तिनं रात्री दहा वाजता बॅग पॅक केली. पण नंतर दीपस्तंभ फाऊंडेशनच्या सागर सरांनी आत्मविश्वास दिला. म्हणाले, 'तू जर आज MPSC सोडले, तर तुला सुखाची झोप कधीच लागणार नाही.' इथूनच तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. सतत प्रयत्न आणि जिद्दीच्या जोरावर ती अधिकारी झाली. चला तर मग जाणून घेऊयात नीलम गाढवेच्या यशाची ही आगळीवेगळी कहाणी... नीलम नऊ महिन्यांची होती. तेव्हा तिच्या वडिलांनी घरगुती हिंसाचारातून आईचा खून केला. त्यानंतर पश्चातापात येऊन स्वतःचंही जीवन संपवलं. त्यावेळी नीलम पोरकी झाली. मात्र, नीलमचे मामा पुढे आले. त्यांनी तिला आपलीच पोर म्हणून जपलं. या भयंकर काळावर नीलम सांगते, 'माझी आई खूप शिकलेली होती. तिला शिक्षिका व्हायचं होतं. पण होऊ शकली नाही. तिला तिच्या मुलीला सगळं सुख द्यायचं होतं. स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं. तेच स्वप्न मामानं मला दाखवलं. आणि मी ते पूर्ण केलं.' 'आज जर आई असती, तर तिला खूप आनंद झाला असता. मला तिचा चेहराही आठवत नाही. मात्र, तिची उणीव मामा-मामी आणि आजी-आजोबांनी कधी भासूच दिली नाही. त्यांनी माझ्यावर पोटच्या पोरीसारखं प्रेम केलं. मी त्यांची यासाठी आयुष्यभर ऋणी राहीन. मी जोपर्यंत लहान होते, तोपर्यंत मला काहीच वाटत नव्हतं. पण आपण जसजसे मोठे होतो तशीतशी आपल्याला समज यायला लागते. इतरांकडे बघतांना मलाही कधी-कधी वाटतं की माझी आई जर असती तर. पण ते शक्य नाही. त्यामुळे माझ्यासाठी माझा मामाच सर्वकाही आहे.' एक संकट संपते न संपतेच तोच काही वर्षांतच नीलमच्या मोठ्या मामांचा मृत्यू झाला. तेव्हा नीलम कळत्या वयाची होती. घरातली परिस्थिती अत्यंत कठीण. त्यामुळे आपणच पुढाकार घेऊन ती सुधरायची हे नीलमने ठाम केलं. पुढे कोणता जॉब अधिक खात्रीदायक असेल याचा शोध सुरू केला आणि MPSC चा पर्याय निवडला. यावर बोलतांना नीलम सांगते... 'घरात परिस्थिती खडतर होती. सगळं ओझं माझ्या एकाच मामावर आलेलं. घरात खाणारे अनेक आणि कमवणारा एकच. त्यामुळं मी तेव्हाच ठरवलं की आपण लवकरात लवकर नोकरी मिळवायची. जेणेकरून घरची परिस्थिती बदलू शकेन. त्यानंतर मी एक वर्ष पोलीस भरतीची तयारी केली. पण तेव्हा कळालं की अधिकारी होणं म्हणजे एक मोठी गोष्ट आहे. अधिकारी झाल्यानं माझं आणि माझ्या कुटुंबाचंही नाव होईल. त्यामुळं मी अधिकारी व्हायचं ठरवलं.' या प्रवासात तिला मामाने मोठा आधार दिला. स्वतःच्या परिस्थितीची पर्वा न करता त्यांनी नीलमच्या शिक्षणासाठी आणि तयारीसाठी शक्य ते सर्व केलं. घरची जबाबदारी सांभाळत नीलमला तिच्या ध्येयाकडे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं. केवळ मामांनीच नाही तर त्यांच्या मुलांनीही आपल्या बहिणीच्या स्वप्नांचे स्वागत केले. आणि सांगितले की,'तू काळजी करू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तुला जे करायचं ते कर.' नीलम सांगते, 'आम्ही थोडेसे आदिवासी पट्ट्यात मोडतो. त्यामुळे गावात फार काही सुविधा नव्हत्या. अभ्यासासाठी खूप लांब जावं लागायचं. त्यामुळं मी 2022 चा अटेम्प्ट घरी राहूनच दिला. 2023 ला माझ्या दादानं मला पुण्याला नेलं. त्याच्याकडे मी एक वर्ष राहिले. मात्र दादा आणि वहिनी दोघेही पोलीस असल्यामुळे ते ड्युटीला जात. घरात लहान मुलं असल्यामुळं त्यांनाही बघावं लागायचं. त्यामुळं अभ्यास होत नव्हता. नंतर मग मी 'दीपस्तंभ फाऊंडेशनची प्रवेश परीक्षा दिली. तिथे माझी निवड झाली. माझ्या छोट्या छोट्या चुकांवर येथेच अगदी बारकाईनं लक्ष देण्यात आलं. मला जे विषय कठीण जात होते ते फाऊंडेशन मधल्या शिक्षकांनी सोपे करून शिकवले. मला घरच्यांचा सपोर्ट तर होताच, पण त्याचबरोबर मी दीपस्तंभची कायम ऋणी राहील. कारण आज मी जे आहे ते फक्त त्यांच्यामुळेच.' मामांना सगळे म्हणायचे मुलगी मोठी झालीये लग्न लावून टाका... नीलम आदिवासी भागातली. मुलीची 18 वर्ष पूर्ण झाली की, तिचं लग्न लावून देण्याची जणू तिकडे प्रथाच आहे. नीलमच्या लग्नासाठीही गावातल्या लोकांनी विडाच उचलला. तिचा खंबीर पाठिंबा असलेल्या तिच्या मामाचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, नीलमबाबत त्यांनी आधीच निर्णय घेतल्यामुळे ते या बोलण्याला बळी पडले नाही. नीलम सांगते की, 'माझ्या मामांना सगळेजण म्हणायचे की तुम्हालाही दोन मुली आहेत. तुम्ही त्यांच्या भविष्याचं बघा. नीलमचे लग्नाचे वय झाले आहे. तीचं लग्न लावून टाका. तिला शिकायचं असेल तर तिच्या नवऱ्याच्या घरी शिकेल. तुम्ही कशाला कष्ट घेताय. पण माझ्या मामाने त्यांना भीक घातली नाही आणि मला माझ्या पायावर उभं केलं. हे इतकं माझ्या सख्या भावानं सुद्धा माझ्यासाठी कधी केलं नसतं. एवढं माझ्या मामानं माझ्यासाठी केलं.' मात्र, अधिकारी होण्याचा हा मार्ग तितका सोपा नव्हता. घरापासून दूर राहून अभ्यास करणं, नवीन वातावरणाशी जुळवून घेणं, आर्थिक परिस्थिती आणि त्यातच स्पर्धा परीक्षेची वाढती स्पर्धा. या सगळ्यांचा सामना नीलमला करावा लागत होता. अनेकदा परिस्थिती मन खचवणारी होती. पण ज्या मामानं आपल्यासाठी एवढं केलं, त्यांच्या कष्टाचं चीज करायचं, हा विचार तिच्या मनात कायम होता. माझा स्वतःवरचा विश्वास उडाला होता! नीलमने पहिल्याच प्रयत्नात पूर्व आणि मुख्य परीक्षा पास केली. त्यानंतर PSI चं ग्राउंड दिलं , interview देखील दिला. मात्र, मुलाखतीमध्ये तिला मार्क कमी पडले. त्यामुळे ती थोडी नाराज होती. कारण पहिल्याच प्रयत्नात तिन्ही टप्पे पार करणे खूप कठीण होतं. त्यामुळं नीलमला विश्वास होता की, आपण पास होणार. पण नेहमीच आपल्या मनासारखं होईल असं नसतं. त्यामुळं नीलमचा स्वतःवरचा विश्वासच उडाला. ती सांगते, ‘मला खूप अस्वस्थ वाटत होतं. मला वाटायला लागलं की एक गावाकडून आलेली मुलगी केवळ पूर्व आणि मुख्यपर्यंतच जाऊ शकते. मुलाखतीसाठी खूप तयारी करावी लागते. मी स्वतःला खूप कमी समजायला लागले होते. नंतर दिलेली पूर्व परीक्षा मी पासच होऊ शकले नाही. तेव्हा मला वाटायला लागलं की, मी आता काहीच करू शकत नाही. कारण मी जर पहिल्या अटेम्प्टमध्ये एवढ्या जवळ जाऊन माघारी यावा तर दुसऱ्यात काहीच होणार नाही. मी सगळं सोडून देण्याचा विचार करत होते. मी मामाला स्वतः फोन केला आणि म्हणलं की तुम्ही माझ्या लग्नाचा आता विचार करा. माझ्याकडून या सगळ्या गोष्टी होणार नाहीत. मात्र, मामा म्हणाले की तू एकदा शेवटचा प्रयत्न कर. तेव्हा मला मामाचा माझ्यावर किती विश्वास आहे हे समजलं आणि त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला.’ ती पुढे म्हणते, 'मी पुन्हा नव्याने उभी राहिले. पूर्व परीक्षा दिली. मुख्य परीक्षा दिली, पण नशिबाने साथ दिली नाही. मुख्य परीक्षा फक्त तीन मार्कांनी गेली. मी पूर्णपणे तुटले होते. मी निर्णय घेतला की आता MPSC करायची नाही. हा निकाल संध्याकाळी सहा वाजता समजला. मी रात्री दहा वाजता माझी बॅग पॅक केली. पण नंतर दीपस्तंभ फाऊंडेशनचे सागर सर यांनी आत्मविश्वास दिला. ते म्हणाले, 'तू जर आज MPSC सोडली तर तुला सुखाची झोप कधीच लागणार नाही.' केवळ सरच नाही तर माझ्यापेक्षा लहान मुलं -मुली मला समजवायला लागले.' या घटनेनंतर नीलममध्ये एक ऊर्जा निर्माण झाली. तिने जोमाने अभ्यास सुरू केला. अखेर 2025 ची पूर्व , मुख्य आणि फायनल निकाल 14 ऑगस्टला आला. त्यामध्ये नीलमचे नाव सर्वात वरती होते. ज्या क्षणाची ती आणि तिचं संपूर्ण कुटुंब अनेक वर्षांपासून वाट पाहत होतं, तो क्षण अखेर आला होता. डोळ्यांत आलेले अश्रू हे केवळ आनंदाचे नव्हते, तर आतापर्यंत सोसलेल्या प्रत्येक संघर्षाची जाणीव करून देणारे होते. STI ची लिस्ट आली. त्यामध्ये ऑर्फन कॅटेगिरीमध्ये नीलम पहिली आली. ज्यादिवशी निकाल लागला तेव्हा सर्वात जास्त आनंद जर कोणाला झाला असेल, तर तो नीलमच्या मामांना. नीलमचे मामा नामदेव दत्तात्रय सस्ते म्हणतात की, 'नीलमने खूप कष्ट केले. तिच्यासमोर अनंत अडचणी आल्या. मनाने खचली, पण पुन्हा उभी राहिली. तिने माझा विश्वास खरा ठरवला. याचा मला खूप आनंद आहे. मला वाटत होते की तिने PSI व्हावं, पण ती सध्या तिच्या पायावर उभी आहे. मला तिला सक्षम बनवायचं होतं. यात यशस्वी झालो याचा आनंद आहे.' नीलमची STI पदी निवड झाल्यावर सर्वांच्याच डोळ्यात अश्रू होते. MPSC मध्ये सातत्य गरजेचे असते स्पर्धा परीक्षा देणे म्हणजे एक प्रकारचे 'दिव्य' आहे. कारण लाखो मुलांमधून आपली निवड होणे, हे काही सोपे नाही. अनेकजण नैराश्यात जातात आणि नको ते निर्णय घेतात. मात्र अपयशातून मार्ग काढत पुढे जाणं, प्रत्येकानं केलं पाहिजे. नीलम सांगते की, 'MPSC परीक्षेमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. तुम्ही किती तास अभ्यास करता याला महत्त्व नाही. तुम्ही कसा अभ्यास करता याला महत्त्व आहे. अभ्यासात सातत्य ठेवले तर तुम्ही देखील IAS, IPS, STI बनू शकता. माझे अनेक मित्र-मैत्रिणी याचमुळे त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचू शकले.' नीलमच्या या शब्दांमध्ये तिच्या संपूर्ण प्रवासाचा सार दडला आहे. कारण तिने स्वतःच्या आयुष्यातही याच सातत्याचा अनुभव घेतलाय. दीपस्तंभ माझ्यासाठी एक कुटुंब आहे नीलम कधी घरापासून दूर राहिली नव्हती. आपल्या माणसांपासून दूर राहणं म्हणजे एकटेपणानं ग्रासनं. त्यामुळं नीलम सुरुवातीला खूप एकटी राहायची. त्यावेळी तिला वाटायचं की मी एक अनाथ मुलगी आहे. मन कोणत्याच गोष्टीत लागत नव्हतं. पण, जेव्हा तिने दीपस्तंभमध्ये प्रवेश केला, तेव्हा तिला तिथे अनेक मुलांच्या रूपात भाऊ भेटले, बहिणी भेटल्या. नीलम सांगते, 'मी दीपस्तंभला आल्यावर काही दिवस एकटी होते. पण नंतर अनेकांशी ओळखी झाल्या. सर्वजण माझे भाऊ - बहीण झाले. आमच्या यजुर्वेंद्र मास्तरांच्या रूपात मला एक वडील भेटले. त्यामुळे मग नंतर मला कुटुंबाची उणीव भासली नाही. दीपस्तंभाच्या लोकांनी मला एवढा जीव लावला की, आज ते माझं एक कुटुंब झालं आहे. मी शेतकरी कुटुंबात असल्यामुळे दरवेळेस दिवाळीला नवीन ड्रेस मिळेल असं नाही. पण मी दोन वर्ष दीपस्तंभलाच माझी दिवाळी साजरा केली होती. तेव्हा त्यांनी आम्हाला कपड्यांच्या दुकानात नेवून आमच्या मनासारखे कपडे खरेदी करून दिले. म्हणजे इथे केवळ अभ्यासच नाही, तर त्याबरोबर तुमच्या भांवनांची देखील काळजी घेतली जाते. त्यामुळे दीपस्तंभ हे माझ्यासाठी कुटुंबापेक्षाही मोठं आहे.' आईचं शिक्षिका होण्याचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न, मामांनी दिलेला विश्वास, कुटुंबाने केलेला त्याग आणि दीपस्तंभने दिलेली साथ या सगळ्यांचा प्रवास नीलमच्या यशात एकवटला आहे. परिस्थितीने तिला अनेकदा थांबवण्याचा प्रयत्न केला, कधी स्वतःवरचा विश्वास डळमळला, तर कधी MPSC सोडून लग्न करण्याचा विचारही तिच्या मनात आला. मात्र प्रत्येक वेळी कोणीतरी तिचा हात धरला आणि तिला पुन्हा उभं केलं. आज नीलम गाढवे STI अधिकारी म्हणून उभी आहे. तिच्या नावापुढे लागलेलं हे पद तिच्यासाठी केवळ सरकारी नोकरी नाही, तर तिने आजवर केलेल्या संघर्षाचे यश आहे. म्हणूनच नीलमची कहाणी केवळ एका मुलीच्या यशाची कहाणी नाही; तर परिस्थितीसमोर हार न मानण्याची, आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवण्याची आणि पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची कहाणी आहे. तिच्या प्रवासाकडं पाहिलं की एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते स्वप्नं मोठी असतील आणि त्यासाठी लढण्याची जिद्द असेल, तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी यशाचा मार्ग नक्की सापडतो.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/PBjXhaE

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.