Type Here to Get Search Results !

प्रगतिशील शेतकरी:अकलकरा व सफेद मुसळीतून 4 महिन्यांत मिळवला 2 लाखांचा नफा, बाजारभाव, विक्री व्यवस्था समजून औषधी वनस्पतींची लागवड

शेतीत केवळ राबून चालत नाही, तर काय पिकवायचे आणि हातात प्रत्यक्ष किती नफा उरतो याचे गणित जमणे गरजेचे आहे. हेच लक्षात घेत सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील गणेश खटाळ आणि अमोल सिरसाठ या दोन मित्रांनी पारंपरिक शेतीला फाटा दिला. मक्याच्या पिकात एकरी ७० हजारांचे उत्पादन मिळूनही सर्व खर्च वजा जाता हातात फक्त २० हजार रुपये उरायचे. त्यामुळे "जास्त उत्पन्नापेक्षा जास्त निव्वळ नफा' देणाऱ्या पिकाचा शोध त्यांनी सुरू केला. सोशल मीडियावरून माहिती घेत आणि थेट राजस्थान गाठून त्यांनी अकलकरा व सफेद मुसळी या औषधी पिकांची लागवड केली. या प्रयोगातून सर्व खर्च वजा जाता तब्बल २ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळण्याचे गणित त्यांनी यशस्वी करून दाखवले आहे. पिकाच्या लागवडीपूर्वी बाजाराचा अभ्यास केला या दोन्ही मित्रांनी केवळ नवीन पीक म्हणून लागवड केली नाही. पीक घेण्यापूर्वीच त्याचा बाजारभाव आणि विक्री व्यवस्थेचा अभ्यास केला. अकलकरा व सफेद मुसळी खरेदीसाठी व्यापारी थेट शेतावर येतात. याशिवाय मध्य प्रदेशातील इंदूर आणि नीमच या मोठ्या मंड्यांचा पर्याय उपलब्ध आहे. "आधी बाजार शोधणे अन् मग पीक घेणे' या नियमामुळे त्यांची विक्रीची चिंता पूर्णपणे मिटली आहे. जूनमध्ये केलेल्या लागवडीला आता पीक येण्यास सुरुवात झाली आहे. चार महिन्यात सरासरी खर्च वजा जाता २ लाख रुपये उत्पन्न मिळते. इंटरनेटवरील माहितीवर आंधळा विश्वास न ठेवता प्रत्यक्ष शेतावर जाऊन अभ्यास करणे, लहान क्षेत्रावर यशस्वी प्रयोग करणे आणि शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहणे, यातून परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. खर्च व उत्पन्नाचे तुलनात्मक गणित असे पारंपरिक मक्याच्या पिकातून एकरी सुमारे ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळायचे; मात्र बियाणे, खते, मशागत व मजुरी मिळून ५० हजार रुपये खर्च व्हायचा आणि हातात निव्वळ २० हजार रुपयेच उरायचे. याउलट, औषधी वनस्पतींच्या प्रयोगात सफेद मुसळीचे २ क्विंटल (दर १ लाख रुपये प्रति क्विंटल) आणि अकलकराचे ४ क्विंटल (दर ३० हजार रुपये प्रति क्विंटल) असे एकूण ३ लाख २० हजार रुपयांचे उत्पादन अपेक्षित आहे. लागवड व मशागतीचा १ लाख २० हजार रुपयांचा खर्च वजा जाता दोनही मित्रांच्या हातात सुमारे २ लाख रुपयांचा निव्वळ नफा उरणार आहे. (प्रगतिशील शेतकऱ्यांचा मोबाइल नंबर : 7020860994)

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/NTAOXe5

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.