नाशिकमध्ये आयशर आणि पिकअप गाडीचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लोखंडी गजाने भरलेल्या आयशर गाडीला पिकअप गाडीने मागून धडक दिली. पिकअप गाडी ही भरधाव वेगात असून चालकाला वेळीच गाडीवर नियंत्रण मिळवता आले नसल्याने हा अपघात घडला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. उड्डाणपुलावरील द्वारका चौक परिसरात रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना स्थानिकांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या घटनेतील मृत आणि जखमी व्यक्ती हे सर्वजण कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कामगार निफाड येथील एका देवदर्शनाच्या ठिकाणाहून परतत असताना अपघातात झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात मुंबई नाका आणि भद्रकाली पोलिस अपघाताची चौकशी करत आहेत. अपघाताचा फोटो... अपघाताचे कारण काय? रात्रीच्या वेळी टेम्पोतून सळईची वाहतूक या अपघातास कारणीभूत ठरली. टेम्पोच्या मागील बाजूकडून बाहेर आलेल्या सळईंना लाल कापड वा तत्सम कुठलेही निशाण नव्हते. ही बाब अंधारात पाठीमागून आलेल्या मालवाहू चालकाच्या लक्षात न आल्याने मालवाहू वाहन टेम्पोवर धडकल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगितले जाते. या अपघातात मालवाहू वाहनातील चेतन पवार, संतोष मंडलिक, अतुल मंडलिक, दर्शन घरत आणि यश खरात यांचा मृत्यू झाल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. नाशिकच्या द्वारका उड्डाणपूलावर अपघात झाल्याने वाहतूक विस्कळीत दरम्यान, नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरील भीषण अपघातानंतर नाशिकच्या द्वारका उड्डाणपूलावर अपघात झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. नाशिकवरून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. उड्डाण पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. नाशिकच्या द्वारका परिसरातील उड्डाण पुलावर हा अपघात झाल्याची माहिती आहे. उड्डाण पुलावर वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून येत आहे..वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या असून गेल्या 30 मिनिटांपासून ही वाहतूक ठप्प आहे. अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून वाहनांचा चुराडा झाला आहे. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने नाशिक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/YK6w5sy
नाशिकमध्ये भीषण अपघात:लोखंडी गजाने भरलेल्या गाडीला भरधाव पिकअपची धडक; 6 जण ठार, 5 गंभीर जखमी
January 12, 2025
0