एलआयसी पॉलिसीच्या नावाखाली नागरिकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या वाकडेवाडी येथील “बनावट कॉल सेंटर” चा पर्दाफाश करत शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली. आरोपींकडे पुणे परिसरातील नामांकित ३५ कंपन्यांचे बनावट रबरी शिक्के सापडले. १५ मोबाइल, १५० सिमकार्ड आणि वेगवेगळ्या ३० बँकांचे अकाउंट बुक, चेकबुकही मिळाले आहेत. आरोपींनी एलआयसीच्या नावाने बनावट ओळखपत्र तयार केले होते. प्राथमिक तपासात आरोपींनी दोघांची फसवणूक केल्याचे समोर आले असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. शंकर कारकून पोखरकर (४२, रा. कात्रज), मेहफूज मेहबूब सिद्दिकी (४०, रा. औंध), आशिष रामदास मानकर (४८, वाघोली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील पोखरकर हा मुख्य सूत्रधार आहे. आपण एलआयसी एजंट असल्याचे सांगून जादा परताव्याच्या आमिषाने आरोपीने २०२१ मध्ये शिवाजीनगर भागातील एकाकडून ५ लाख ४ हजार रुपये उकळले. काही दिवसांनी पैसे मिळतील असे त्यांना सांगण्यात आले होते. यादरम्यान खात्री करण्यासाठी फिर्यादीने संपर्क साधला असता आरोपींचा फोन बंद लागला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत संबंधित व्यक्तीने २०२३ मध्ये शिवाजीनगर पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. तेव्हापासून शिवाजीनगर पोलिस आरोपींच्या मागावर होते. आरोपी सातत्याने राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने सापडत नव्हते. दरम्यान, तांत्रिक तपासावरून शिवाजीनगर सायबर पथकातील अंमलदार आदेश चलवादी, तेजस चोपडे यांनी बनावट कॉल सेंटरचा ठावठिकाणा घेतला. तब्बल १५० सिम कार्ड जप्त वाकडेवाडी येथे फ्यूचर ग्लोबल सर्व्हिस नावाने सुरू असलेल्या कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पथकाला येथून विविध कंपन्यांचे १५० सिम कार्ड, ३० विविध बँकेचे खाती व चेकबुक, १५ मोबाइल, २९ डाटा रजिस्टर, १२ एटीएम कार्ड, ५ पॅन कार्ड, २ संगणक, ३५ विविध कंपन्यांच्या नावाचे बनावट शिक्के मिळून आले. या प्रकरणात पोलिसांनी पोखरकर, सिद्दिकी आणि मानकर यांना अटक केली. प्राथमिक तपासात आरोपींनी दोघांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मात्र, त्यांनी आणखीही बऱ्याच लोकांना गंडा घातला. एलआयसी ग्राहकांचा मिळवला डेटा अटक करण्यात आलेल्या आरोपींमधील एक जण यापूर्वी एलआयसी पॉलिसी काढून देण्याचे काम करत होता. त्यातून त्याने एलआयसीचा ग्राहकांचा डेटा मिळवला. त्यावरून नागरिकांशी संपर्क साधला जात होता.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/kEtFo4d
"एलआयसी' च्या नावाखाली बोगस कॉल सेंटर:3 अटकेत, 35 कंपन्यांचे बनावट रबरी शिक्के जप्त
February 01, 2025
0