नवाबाचे वंशज असल्याची थाप मारून मोक्याची जमीन देण्याचे आमिष दाखवत महिला डॉक्टरकडून तिघांनी ८० लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सिराज यारखान हसन यारखान (रा. मिल काॅर्नर,) सय्यद तौखीर हैदर एस.के. हुसेन (रा. राघवेंद्रनगर, सिकंदराबाद), सय्यदा तस्लीम फातिमा मीरलायक अली (रा. पुरानी हवेली, चारमिनार, हैदराबाद) अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी सिराज यारखान, हसन यारखान याला सायंकाळी साडेसात वाजता अटक केली. डॉ. रुबिना नसिरुद्दीन सिद्दिकी (रा. रोजेबाग) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी सिराज यारखान हे त्यांचे नातेवाईक असून त्याने आरोपी सय्यद तौखीर हैदर एस. के. हुसेन याची ओळख करून दिली. हुसेन हे हैदराबाद येथील नवाबांचे वंशज सय्यदा तस्लीम यांचे नातेवाईक आहेत. नवाब वंशांच्या तस्लीम यांची सुभेदारी गेस्ट हाऊस परिसरात बरीचशी जमीन आहे. तिचा ताबा मिळण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकरण चालू असल्याचे सांगितले. शासकीय जमिनीची केली खोटी इसारपावती जुलै २०२१ मध्ये आरोपींनी फिर्यादीची भेट घेऊन तुम्ही गुंतवणूक करा असे सांगितले. त्यावरून १० ऑगस्ट २०२१ ते ६ सप्टेंबर २०२१ या कालावधीत १५ लाख रुपये सिराज यारखान यांना दिले. आरोपींनी फिर्यादींकडून ऑनलाइन आणि रोख मिळून ८० लाख रुपये घेतले. यानंतर फिर्यादींनी जमिनीची मागणी केली. आरोपींनी खोटी इसारपावती दिली. मात्र, ती जमीन शासकीय असल्याने विक्री करता येणार नाही, अशी माहिती फिर्यादींना मिळाली. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. जीपीएची प्रत दाखवून केली फसवणूक फिर्यादी महिलेचा विश्वास बसण्यासाठी आरोपींनी त्या जागेच्या जीपीएची प्रत दाखवली. ही प्रत नोंदणीकृत नसतानादेखील फिर्यादींनी विश्वास ठेवला. जागेचा ताबा मिळवण्यासाठी आम्हाला पैशांची गरज आहे, तुम्ही पैशांची मदत करा तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ १२०० चौरस फूट भूखंडाची इसारपावती करून देण्याचे आमिष दाखवले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/mBWqiE3
नवाबाचे वंशज असल्याची थाप;महिला डॉक्टरला 80 लाखांचा गंडा:छत्रपती संभाजीनगरची घटना, मोक्याच्या जमिनीचे आमिष
February 15, 2025
0