पोलिसांनी पकडलेल्या आरोपीची सुटका करण्यासाठी त्याच्या साथीदारांनी चक्क एका पोलिस कर्मचाऱ्याचे अपहरण केले. जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र - मध्य प्रदेश सीमेवरील उमर्टी या गावात हा प्रकार घडला होता. पोलिस कर्मचाऱ्याच्या सुटकेसाठी खुद्द पोलिस अधीक्षक सीमेपलीकडील गावात दाखल झाले होते. सुमारे 4 तासांच्या थरारानंतर अपहृत पोलिस कर्मचाऱ्याची सुखरुप सुटका झाली. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर दोन उमर्टी गाव आहेत. एक गाव महाराष्ट्रात असून दुसरे गाव सीमेच्या पलीकडे मध्य प्रदेशात आहे. चोपडा ग्रामीण पोलिस महाराष्ट्रातील उमर्टी गावात एका गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी गेले होते. पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली. पण आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर गावातील काही लोक पोलिसांच्या अंगावर धावून आले. त्यानंतर काही जणांनी एका पोलिस कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन मध्य प्रदेशातील उमर्टी गावात नेले. आरोपीला सोडा अन्यथा पोलिस कर्मचाऱ्याला सोडणार नाही, असा पवित्रा पोलिस कर्मचाऱ्याचे अपहरण करणाऱ्यांनी घेतला होता. अपहृत कर्मचाऱ्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांशी साधला संपर्क पोलिस कर्मचारी व संबंधित गावात अवैध शस्त्र विक्री करणारे यांच्यात वाद झाल्यानंतर या वादात संबंधितांनी पोलिस कर्मचाऱ्याचे अपहरण केल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच जळगावचे जिल्हा पोलिस अधीक्षक माहेश्वर रेड्डी तातडीने उमर्टीकडे रवाना झाले. पोलिस कर्मचाऱ्याच्या सुटकेसाठी मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला होता. 4 तासांच्या थरारनंतर सुखरुप सुटका सुमारे चार तासांच्या थरारानंतर अपहृत पोलिस कर्मचाऱ्याची सुटका करण्यास पोलिसांना यश आले. महाराष्ट्राच्या सीमे पलीकडे मध्य प्रदेशात असलेल्या उमर्टी गावात जाऊन पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलिस अधिकारी अपहरण झालेल्या कर्मचाऱ्याला घेण्यासाठी मध्य प्रदेशातील उमर्टी गावात दाखल झाले होते. पोलिसांनी कर्मचाऱ्याला सुखरूपपणे ताब्यात घेतले आणि रात्री उशिरा चोपड्यात दाखल झाले. पोलिसांची मोठी कारवाई होण्याच्या भीतीने अपहरणकर्त्यांनी अपहृत पोलिस कर्मचाऱ्यास पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी दिली आहे. पण घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली होती.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/TCHdy0N
चक्क गुन्हेगारांनी केले पोलिसाचे अपहरण:अखेर 4 तासांच्या थरारानंतर सुखरुप सुटका; जळगावच्या MP सीमेवरील घटना
February 15, 2025
0