Type Here to Get Search Results !

हिंगोलीत बासंबा फाट्या जवळ अवैधरित्या लाकूड तोड:लाकडासहीत ट्रक ताब्यात, दिवसभरात वन विभागाची दुसरी कारवाई

बासंबा फाट्या जवळ अवैधरित्या लाकूड तोड करून वाहतूक करणारा ट्रॅक्टर लाकडासह वन विभागाच्या पथकाने रविवारी ता. २ रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पकडला असून या प्रकरणी वन विभागाकडून पुढील कारवाई केली जात आहे. आज दिवसभरात वन विभागाची दुसरी कारवाई आहे. हिंगोली जिल्हयात वन विभागाच्या आखत्यारीत असलेल्या जमीनीवरून अवैधरित्या वृक्षतोड करून वाहतूक करणाऱ्या विरुध्द कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी विभागीय वन अधिकारी डॉ.राजेंद्र नाळे, सहाय्यक विभागीय वन अधिकारी सचिन माने यांनी वन परिक्षेत्रांतर्गत कारवाईसाठी भरारी पथकासह स्थानिक अधिकाऱ्यांची पथके स्थापन केली आहेत. दरम्यान, आज सकाळी कळमनुरी शिवारातून वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, कर्मचारी काळे, काशीदे यांच्यासह पथकाने लाकूड व टेम्पो जप्त केला आहे. या प्रकरणी वन विभागाच्या पथकाने पुढील कारवाई केली जात आहे. त्यानंतर आज रात्रीच्या सुमारास वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनरक्षक निकीता चव्हाण, सारंग शिंदे यांच्या पथकाने हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर गस्त सुरु केली होती. यावेळी बासंबा फाट्याजवळ एका ट्रॅक्टरमधून अवैधरित्या वृक्षतोड करून लाकडांची वाहतूक केली जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने रात्री नऊ वाजता बासंबा फाटा येथे ट्रॅक्टर थांबवून चालकाकडे लाकडाच्या तोडणी व वाहतुकीच्या परवानगी बद्दल विचारले असता चालकाला समाधानकारक उत्तरे देता आले नाही. त्यामुळे यापथकाने लाकूड व ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत पुढील कारवाई सुरु होती. दरम्यान, आज दिवसभरात वन विभागाने केलेली ही दुसरी कारवाई असून यामुळे अवैधरित्या वृक्षतोड करून वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तर औंढा नागनाथ तालुक्यामध्येही एक कारवाई झाली असल्याचे वृत्त आहे. मात्र अधिक माहिती मिळू शकली नाही.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/QWxPog4

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.