Type Here to Get Search Results !

आदिवासी विभागातील 114 कोटींच्या गणवेश घोटाळ्याची चौकशी होणार:‘दिव्य मराठी’ची बातमी दाखवून एकनाथ खडसेंनी उपस्थित केला प्रश्न

आदिवासी विभागातील ११४ कोटींच्या गणवेश खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांनी बुधवारी विधान परिषदेत केला. ‘दिव्य मराठी’ने २५ मार्चच्या अंकात हा घोटाळा उघडकीस आणला होता. त्या बातमीचे कात्रण सभागृहात दाखवून खडसेंनी सरकारला जाब विचारला. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल’ अशी ग्वाही दिली. अंतिम आठवडा प्रस्तावावर खडसे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याच्या घोषणेवरून सरकारला धारेवर धरले. आरोग्य, आदिवासी, परिवहन, सार्वजनिक बांधकाम आदी विविध विभागातील भ्रष्टाचाराची प्रकरणेही बाहेर काढली. आदिवासी विकास विभागातील ११४ कोटींची गणवेश खरेदी संशयास्पद’ ही बातमी खडसेंनी सभागृहात दाखवली. एक कोटीपेक्षा अधिक रकमेची खरेदी दर करारानुसार न करता निविदा प्रक्रिया राबवूनच केली जावी, या शासनाच्या आदेशाला फाटा देत आदिवासी विकास विभागाने गणवेश व नाइट ड्रेसची खरेदी केली. त्यातील सुमारे ७२ कोटींची देयके पुरवठादार संस्थेला अदाही केली. या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी खडसे यांनी केली. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी गणवेश खरेदीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात केस सुरू असून न्यायालयाने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. मात्र प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने हायकोर्टाने संबंधित विभागाला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अधिकारी हे कोर्टाला ही मानत नाही असे दिसून येते. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने दखल घेऊन सखोल चौकशीची मागणी केली. विधान परिषद सभापती राम शिंदे यांनीही या प्रकरणी सरकारला कळवण्यात येईल असे सांगितले. पाटबंधारे खात्यात डोळे पांढरे करणारा भ्रष्टाचार आरोग्य, परिवहन, पीडब्ल्यूडी खात्यातही भ्रष्टाचार सुरू आहे. पाटबंधारे खात्याचा भ्रष्टाचार काढला तर तुमचे डोळे पांढरे होतील, असे एकनाथ खडसे म्हणाले. निवडणुकीच्या काळात पाटबंधारे खात्यामध्ये ८०० ते १००० कोटींचे टेंडर काढले. पाणी नाही, पण पाइपलाइनचे टेंडर काढण्यात आले. निवडणुकीच्या कालखंडात पाटबंधारे विभागाने २५ हजार कोटींचे टेंडर्स काढल्याचा आरोपही खडसे यांनी केला.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Lr9mybp

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.