छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्याचा निर्णय कोल्हापूरच्या कोर्टाने शुक्रवारी दिला. २५ मार्चला अटक झालेला प्रशांत कोरटकर आता ३० मार्चपर्यंत तुरुंगातच राहील. दरम्यान, सुनावणी संपल्यानंतर एका वकिलाने त्याला न्यायालयाच्या आवारातच मारहाण केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने प्रकरण फार वाढले नाही. पोलिस कोठडी संपल्याने शुक्रवारी प्रशांतला न्यायालयात हजर केले होते. सुनावणी संपल्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास कोर्ट परिसरातील कॅन्टीनजवळ अमितकुमार भोसले (रा. रुकडी, ता. हातकणंगले) हा वकील प्रशांतच्या अंगावर चालून गेला. ‘ए परशा, छत्रपतींबद्दल तू आक्षेपार्ह बोलतोस...’ असे म्हणत ५० पोलिसांसमक्ष त्याला कोल्हापुरी चपलेने मारहाण केली. पोलिसांनी नंतर भोसले याला ताब्यात घेतले व ठाण्यात नेले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यापूर्वी प्रशांतला पोलिस ठाण्यातून कोर्टात नेतानाही काही शिवभक्तांनी निदर्शने केली होती. प्रशांतसोबत असलेल्या प्रतीकला अजून अटक का नाही : काँग्रेस काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले,‘आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार प्रशांतला तेलंगणात अटक करण्यात आली त्या वेळी प्रतीक पडवेकर हा त्याच्यासोबत होता. मग त्याला का लपवून ठेवले आहे? महिनाभर प्रशांतला खरी मदत कोण करत होते, ते पुढे का येत नाही? प्रशांतच्या अटकेसंदर्भात काही माहिती का लपवली जात आहे? छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे प्रेमी असाल तर गृहमंत्र्यांनी सर्व माहिती जाहीर करावी,’ असे आव्हान लोंढे यांनी दिले. फरार असताना मदत करणाऱ्यांची प्रशांतने नावे सांगितल्याचा दावा न्यायाधीश एस. एस. तट यांच्यासमोर प्रशांतची सुनावणी झाली. सुमारे महिनाभर फरार असताना आपल्याला ज्यांनी मदत केली त्यांची नावे प्रशांत कोरटकरने सांगितल्याची माहिती आहे. त्यांचीही चौकशी करायची असल्याने कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली, तर प्रशांत त्यांच्या घरात कमावणारा एकटा असल्याचे सांगून बचाव पक्षाने त्याला जामीन देण्याची मागणी केली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/m9MRGV4
कोर्ट आवारात कोरटकरला वकिलाची चपलेने मारहाण:छत्रपतींच्या अवमानाचा गुन्हा; अजून 2 दिवस कोठडीत वाढ
March 28, 2025
0