पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याच्या प्रकरणात पोलिसांपाठोपाठ आता पुण्यातील सरकारी रुग्णालय ससूनचे प्रशासनही असंवेदनशील झाल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला आरोपी दत्तात्रय गाडे व पीडित तरुणीचे परस्पर संमतीने संबंध होते असे सांगून पोलिसांनी तिचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. आता बलात्काराची केस मागे घेण्यासाठी तिच्या कुटुंबीयांवर दबाव टाकला जात आहे, अशी माहिती पीडितेचे वकील असीम सरोदे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. इतकेच नव्हे तर अत्याचारानंतर जेव्हा पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा तिची महिला डॉक्टरऐवजी चक्क पुरुष डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली, असा दावाही वकिलांनी केला. या प्रकरणात साेमवारी पुणे न्यायालयात पीडित तरुणीचा कलम १६४ नुसार जबाब नाेंद केला. तृतीयपंथींची पाेलिसांकडे तक्रार, म्हणे आमची बदनामी आराेपी दत्तात्र्य गाडे याने ताे समलैंगिक, गे असल्याचे सांगितले हाेते. त्यामुळे पाेलीसांनी त्याची पुरुषत्वाची तपासणी केली त्यामध्ये अहवाल सकारात्मक आला आहे. मात्र, आराेपी गे नसूनही त्याने तृतीयपंथी असल्याचा दावा केल्याने तृतीयपंथीचे एका शिष्टमंडळाने येऊन आराेपी विराेधात स्वारगेट पोलिसात तक्रार केली आहे. तृतीयपंथी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आराेपी करत असून ताे आमच्यातील नाही. त्याला कडक शिक्षा करण्याची मागणी केली. आराेपीस नाेकरीवरुन काढलेले आराेपी दत्तात्र्य गाडे हा पूर्वी रांजणगाव एमआयडीसी याठिकाणी एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत हाेता. परंतु त्याचे वर्तन हे महिलांबाबत आक्षेपार्ह असल्याने कंपनीतील महिलांनी त्याच्या विराेधात कंपनीच्या प्रमुखांकडे तक्रार दाखल केल्या हाेत्या. त्यामुळे त्यास कामावरुन काढून टाकण्यात आल्याची माहिती पाेलीस चाैकशीत समाेर आली आहे. त्यानंतर ही आराेपीच्या वर्तनात बदल घडला नाही. शिरुर परिसरातील एका लाॅजबाहेर थांबून विवाहबाहय संबंध असलेल्या महिलांचे फाेटाे काढून त्यांना ब्लॅकमेल करुन पैशाची किंवा शारिरिक संबंधाची ताे मागणी करत असल्याचे धक्कादायक प्रकार देखील घडलेले आहे. त्यामुळे याबाबत पिडित महिलांनी आराेपी विराेधात तक्रार देण्यास पुढे येण्याचे आव्हान पाेलीसांनी केले आहे. पीडिता म्हणते... आराेपी हल्ला करेल अशी भीती वाटल्याने मी ओरडले नाही या घटनाक्रमाबाबत पीडितेने जे सांगितले त्याची माहिती डॉ. असीम सरोदे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. ते म्हणाले,‘पीडित तरुणी मध्यमवर्ग कुटुंबातील असून आराेपीसाेबत तिची याआधी काेणतीही ओळख नव्हती. घटनेदिवशी आरोपीने आपण कंडक्टर असल्याचे सांगून तिची फसवणूक केली. तिला बसमध्ये नेऊन अतिप्रसंग केला. बसमध्ये आराेपीने जबरदस्तीने मला पकडल्यावर मी आरडाओरड केली, परंतु ताे आवाज बाहेर गेला नाही. मी त्याला कडाडून विराेध केला तर हा मला मारून टाकेल का? जखमी करेल? हल्ला करुन मला धमकावेल का? अशी भीती वाटत होती. यामुळे मी नंतर एखादे स्वप्न पहावे त्याप्रमाणे ओरडत असल्याचा भास मला हाेत राहिला व आराेपीने त्याला जे पाहिजे ते निघृण कृत्य केले. शरीराची शिथिलता पडल्याने माझी धक्क्यामुळे वाचा बसल्याने मी घटनेनंतर बस बाहेर आल्यावर आेरडली नाही. किंवा लगेच पाेलीसांकडे तक्रार दाखल केली नाही. परंतु मित्र व कुटुंबाशी बाेलणे केल्यावर मला धीर मिळाला व पुन्हा गावी जाताना बस मधून उतरुन स्वारगेट पाेलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. पीडितेने मागणी केली असती तर महिला डॉक्टर दिली असती : डीन ससूनचे अधिष्ठाता डाॅ. एकनाथ पवार म्हणाले, पीडितेची तपासणी करताना पोलिसही हजर होते. ससूनमध्ये काही महिला डाॅक्टरच्या जागा रिक्त आहेत. तपासणी केलेल्या विभागात शिकाऊ महिला डाॅक्टर आहेत. अशा प्रकरणात जबाबदार डाॅक्टरांना कागदपत्रांवर सह्या कराव्या लागतात. त्यामुळे त्यांनीच तपासणी केली असेल. पीडितेने महिला डाॅक्टरची मागणी केली तर तिला महिला डाॅक्टर देण्यात येते. त्याकरिता काही वेळ लागताे. पीडितेने तशी मागणी केली की नाही ते पाहावे लागेल.’ ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला ससूनमध्ये सुविधा देण्यात आल्या. त्याला पळून जाण्यातही मदत इथूनच झाल्याचा आरोप आहे. पाेर्शे अपघात प्रकरणात येथील डाॅक्टरांनी पैसे घेऊन अल्पवयीन आराेपी व त्याच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलले होते. त्यांना अटकही झाली. २४ तासांत जबाब नोंदवणे गरजेचे, पण तसे झाले नाही : असीम सराेदे असीम सराेदे म्हणाले, तरुणीने न्यायालयात कलम १६४ नुसार गोपनीय जबाब नोंदवला. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार बलात्कार प्रकरणात पीडितेचा घटनेनंतर तक्रार आल्यावर २४ तासांत जबाब नाेंद झाला पाहिजे, परंतु तसे या प्रकरणात झाले नाही. तसेच तिच्या वैद्यकीय तपासणीकरिता सरकारी रुग्णालयात महिला डाॅक्टर उपलब्ध नसतील तर त्याबाबतची माहिती लेखी दिली गेली पाहिजे, मात्र ससून रुग्णालय प्रशासनाकडून तसे कळवले गेले नाही.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/OqAFUQB
स्वारगेट अत्याचार प्रकरणी केस मागे घेण्यासाठी पीडितेवर दबाव; वकिलांचा आरोप:बलात्कारपीडित तरुणीची तपासणी पुरुष डॉक्टरांकडून
March 03, 2025
0