लाडकी बहीण योजनेत महिलांना आतापर्यंत ९ हप्ते मिळाले आहेत. आता एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी महिलांच्या खात्यावर फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे लाभ जमा करण्यात आले होते. एप्रिल महिन्याचा १० वा हप्ता असून महिन्याच्या शेवटी ३० एप्रिलला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे यंदा लाभार्थींची संख्या घटणार की वाढणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये लाभ बँक खात्यात जमा होतो. मार्चपर्यंतचे सर्व लाभ लाभार्थींच्या खात्यावर सुरळीतपणे जमा झाले. या योजनेचे पुढील हप्तेसुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणे हे सरकारसमोरचे मोठे आव्हान आहे. योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांच्या अर्जाची तपासणी सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यात महिला बालविकास विभागाकडून तपासणी केली जात आहे. त्यामुळे यंदा किती लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आतापर्यंत ११ लाख बहिणी अपात्र : सदर योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी लागू आहे. त्यामुळे ६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होतो. त्यामुळे लाभार्थींची संख्या नियमितपणे बदलत असते. या योजनेसाठी अर्ज केलेल्या एकूण महिलांपैकी आतापर्यंत जवळपास ११ लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. अडीच कोटी महिलांना लाभ लाडकी बहीण योजनेंतर्गत आतापर्यंत जुलै २०२४ ते मार्च २०२५ पर्यंत एकूण ९ हप्त्याचे एकूण १३ हजार ५०० रुपये लाभ लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झाला आहे. लाडकी बहीण योजनेतील २ कोटी ५३ लाख महिलांना जुलै महिन्यापासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी आतापर्यंत ३३ हजार २३२ कोटी रुपये खर्च झाला आहे. २०२५- २६ मध्ये या योजनेसाठी ३६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, स्वत:हून काही महिला आपल्याला लाभ नको म्हणून अर्ज देत आहेत. २१०० रुपये कधी मिळणार? लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र, याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अर्थसंकल्पात महिलांना २१०० रुपये देऊ अशी घोषणाच केली नव्हती असे सांगितले. तर आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना २१०० रुपये देऊ, असे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवारांनी म्हटले आहे. त्यामुळे २१०० रुपयांसाठी लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Ibh0uqH
लाडक्या बहिणींना दहावा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मिळणार:निकषात न बसणाऱ्या बहिणींच्या अर्जांची होणार तपासणी
April 09, 2025
0