नाशिकपासून ३१ किमीवर मुंबई महामार्गावरील मुंढेगाव शिवारात जिंदाल पॉलिफिल्मस कंपनीत मंगळवारी (दि.२०) मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास भीषण आग लागून तीन कामगार जखमी झाले. तब्बल १९ तास आग भडकत होती. २२ अग्निशमन बंबांच्या १०० हून अधिक फेऱ्या होऊनही आग विझविण्याचे प्रयत्न बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली की कोणी अज्ञात व्यक्तीने लावली याबाबत तज्ञांकडून तपास करण्यात येईल, अशी माहिती कंपनी व्यवस्थापनाने दिली आहे. कंपनीच्या चार नंबर गेटच्या मागील शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर कच्चा माल साठवलेला आहे. याच भागातून आग भडकली. काही वेळातच सर्वत्र धुराचे लोट पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. कामगारांनी अग्निशमनविराेधी यंत्रणा कार्यान्वित केली आणि बाहेर पडले. कच्चा माल, ज्वलनशील पदार्थ तसेच प्लास्टिकमुळे आग भडकत होती. आगीबरोबरच स्फोटांच्या आवाजामुळे परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनीत बहुतांशी परप्रांतीय कामगार असून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/qQDZE3m
बंबांच्या 100 हून अधिक फेऱ्या तरी आग आटोक्यात येईना,3 जखमी:नाशिकला पॉलिफिल्म कंपनीतील आग 19 तासांनंतरही आटोक्यात नाही
May 21, 2025
0