प्लॉटिंगमध्ये गुंतवणुकीत कल वाढल्याने त्यात फसवणुकीचेही प्रकार वाढत आहेत. फुलंब्री शहरात बाजार समितीसमोरील गट नंबर १७ मध्ये नियोजित हरिओमनगरमध्ये बिल्डरने बनावट एनए (अकृषक) प्रकरण दाखल करून १५० जणांना २०,००० चौरस फूट जमीन १२०० रुपये प्रतिचौरस फूट दराने विकली. यातून २४ कोटींचा गंडा घातला. उपविभागीय अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी, शिक्के वापरल्याचा प्रकार दैनिक ‘दिव्य मराठी’ने केलेल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आला आहे. २०१७-१८ मध्ये छत्रपती संभाजीनगर ते फुलंब्रीदरम्यान महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर गट नंबर १७ मध्ये हरिओमनगरमध्ये २० हजार चौरस फुटात १५० प्लॉट पाडले होते. ६०० ते २००० चौरस फुटांचे प्लॉट या ठिकाणी आहेत. मात्र गट नं १७/१ चा एनए परवाना बनावट असल्याने बांधकाम परवाना देता येत नसल्याचा ठपका नगरपंचायतीच्या अभियंत्यांनी ठेवला. बिल्डर सुनील बिरारीला अटकेनंतर जामीन मिळाला, तर डेव्हलपर सचिन हावळे या गुन्ह्यात अटकेत आहेत. बिल्डर बिरारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा माेबाइल बंद असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. प्लॉट खरेदीत अशी टाळा फसवणूक 1 प्लॉट घेताना त्या गटातील सर्व कागदपत्रांची नोंदणी करण्यापूर्वी खात्री करावी. 2 नगररचना विभागात जाऊन एनए परवानगी, लेआऊट मंजुरी याची पडताळणी करावी. 3 संबंधित गटामध्ये लेआऊट टाकले असल्याची कागदपत्रे नगररचना विभागाकडून प्राप्त करून घ्यावी. आयुष्याची कमाई दिली तरी घराचे स्वप्न भंगले आयुष्यभराची कमाई त्यासाठी लावली. घराचे स्वप्न पूर्ण होणे दूरच, आता पैसेही अडकले आहेत. - शेख जाकीर, प्लॉटधारक संचिका जप्त केली अकृषीची परवानगी देण्यात आलेली नाही. गट नं.१७ मधील एनए ४४ चे सर्व दस्तऐवज बनावट आहेत. -ऋषिकेश भालेराव, मुख्याधिकारी गट नंबर १७ मध्ये ६ एकरात प्लॉटिंग आहे. त्या वेळी १२०० रुपये चौरस फूट दराने १५० जणांना प्लॉट विकले. - योगेश पाथ्रीकर, फुलंब्री थेट सवाल -नीलम बाफना, उपविभागीय अधिकारी, फुलंब्री फुलंब्रीतील गट नं.१७ मध्ये एनए परवानगी दिली आहे का? - यासंदर्भात चौकशी सुरू आहे. एनएसाठी आपल्याकडे परवानगी मागण्यात आली होती का? - यासंदर्भातील संचिका फुलंब्री पोलिसांनी जप्त केली आहे. फसवणूक झालेल्या प्लॉटधारकांचे पैसे परत मिळतील? - हे प्रकरण जुने आहे. ते माझ्या कार्यकाळातील नाही, त्यामुळे मी माहिती देऊ शकत नाही. यासंदर्भात पोलिस प्रशासन पुढील तपास करत आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/hMZelVI
फुलंब्रीत नकली सही-शिक्के वापरून बिल्डरकडून फसवणूक; 150 जणांना विकले प्लॉट:बनावट ‘एनए’वर प्लॉट विक्री; 24 कोटींचा गंडा
May 20, 2025
0