Type Here to Get Search Results !

ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी:रुग्णालयातील कर्मचारीच निघाला आरोपी, खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी केली अटक

पुणे शहरातील ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा बनाव करून खळबळ उडवणाऱ्या व्यक्तीस अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ससूनमधील एका डॉक्टरच्या मोबाईलवर एका फोन नंबरवरून अज्ञात इसमाने ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब या आशयाचा मेसेज केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी ससून रुग्णालयाचा संपूर्ण परिसर पिंचून काढला. पण संशयास्पद असे काहीच आढळले नाही. या घटनेची गंभीर दखल घेत बंडगार्डन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि अखेर त्याला अटक केली. विशेष म्हणजे मेसेज करणारा आरोपी हा ससून रुग्णालयातील कर्मचारी निघाला. अरविंद कृष्णा कोकणी (वय 29) असे आरोपीचे नाव आहे. अरविंद हा ससूनमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. त्याने 12 मे रोजी ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब असल्याचा मेसेज रुग्णालयातील एका डॉक्टरच्या मोबाईलवर केला होता. धमकीच्या मेसेचची माहिती पोलिसांना देण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये तणाव होता, त्यामुळे या धमकीकडे जास्त गांभीर्याने घेण्यात आले. बंडगार्डन पोलिस, बीडीडीएस यांनी हॉस्पिटल पिंजून काढले. मात्र, काहीही आढळून आले नाही. त्यामुळे कुणीतरी खोडसाळपणा केला असावा, असा निष्कर्ष काढण्यात आला. पण या धमकीला गंभीरतेने घेत पोलिसांनी धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांना खबऱ्यांच्या माध्यमातून रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणानेच ही धमकी दिल्याची महत्त्वाची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी आरोपी अरविंद कोकणी याला येरवडा परिसरातून अटक केली. आरोपी सुरुवातीला गुन्ह्याची कबुली देत नव्हता. पण पोलिसांनी त्याला हिसका दाखवल्यानंतर त्याने सर्वकाही कबूल केले. तसेच त्याने कोणाच्या मोबाईलवरून मेसेज केला याबाबत माहिती दिली. अरविंद कोकणी याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका महिला रुग्णाचा मोबाईल चोरला. त्याच मोबाईलवरून त्याने एका डॉक्टरला ससूनमध्ये बॉम्ब असल्याचा मेसेज पाठवला. मेसेज पाठवल्यानंतर त्याने मोबाईल बंद केला. दुसऱ्या दिवशी परत मोबाईल पुन्हा सुरू करून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनाही तोच धमकीचा मेसेज पाठवण्यात आला. पुन्हा मोबाईल बंद केला. पोलिसांनी अत्यंत बारकाईने केलेल्या तपासानंतर, आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले. त्याने अशा प्रकारचा मेसेज का पाठवला? याची चौकशी आता बंडगार्डन पोलिस करत आहेत.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/40Mi8Pr

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.