विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवारांनी किमान पाच वेळा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तीच इच्छा त्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा जाहीर केली. त्यांच्या पक्षातर्फे वरळी येथे १ ते ४ मे कालावधीत महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव साजरा होत आहे. त्यात २ मे रोजी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात अजित पवारांनी मनातील भावना व्यक्त केली. सत्कारमूर्ती महिला राही भिडेंच्या एका वक्तव्याचा धागा पकडत ते म्हणाले, मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं. पण कुठं जमतंय. कधी ना कधी सीएमपदाचा योग येईल. योग येणारच नाही असे नाही. महिलांना उद्देशून पवार यांनी सांगितले की, ममता बॅनर्जी पं. बंगालमध्ये मुख्यमंत्री झाल्या. जयललितांनी स्वत:च्या तमिळनाडूत ताकदीवर राज्य मिळवले. हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, इथंही महिला मुख्यमंत्री होऊ शकते. सुनेत्रा पवारांसह अन्य महिलांचाही सत्कार महोत्सवात ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पार्श्वगायिका बेला शेंडे, धावपटू ललिता बाबर, नेमबाज राही सरनोबत,ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे तसेच राज्यसभा तालिका सभापतिपदी निवडीबद्दल सुनेत्रा पवारांचाही सत्कार करण्यात आला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/WXMNG3Y
कधीतरी सीएम होण्याचा योग असा आशावादही व्यक्त:अजित पवारांकडून पुन्हा व्यक्त झाली मुख्यमंत्री होण्याची इच्छा
May 02, 2025
0