रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत परीक्षार्थी रुग्णालयातून सलाइन काढून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन नीटसाठी पोहोचला होता. रुग्णाला व्यवस्थित चालताही येत नव्हते. त्यामुळे भावाने आधार देत केंद्रावर आणले होते. परीक्षार्थीने नीटचा पेपर चांगला गेल्याचे ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. एन-६ मध्ये रोहन जाधव (नाव बदलले) राहतो. रोहनच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर रोहनच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी भावाने उचलली. रोहनचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे. त्यामुळे रोहनला त्याच्या भावाने राजस्थानातील कोटा येथे एका खासगी क्लासमध्ये शिक्षणासाठी पाठवले होते. यादरम्यान तो अचानक आजारी पडायला लागला. त्यामुळे त्याने जवळच्या रुग्णालयात तपासणी केली. त्यात त्याला रक्ताचा कर्करोग असल्याचे समोर आले. त्यानंतर तो शहरात आला. एका खासगी रुग्णालयात दाखल झाला. रक्ताच्या कर्करोगाशी लढताना त्याने अभ्यासदेखील सुरू ठेवला. रविवारी (४ मे) एका केंद्रावर त्याची परीक्षा होती. रोहनने तात्पुरता डिस्चार्ज घेतला. त्याच्या भावाने परीक्षा केंद्रावर अक्षरशः पकडून आणले. त्याला चालताही येत नव्हते. तोंडाला मास्क लावलेला होता. हातात सलाइनची सुई तशीच होती. अशा अवस्थेत रोहनने परीक्षा दिली. परीक्षा केंद्रातून त्याच्या भावाने एक हात खांद्यावर, एक हात हातात धरून अशा परिस्थितीत बाहेर आणले. या वेळी त्याच्या भावाचे डोळे पाणावले होते. परंतु तो लढत होता. नीटचा पेपर चांगला गेला. कर्करोगाला हरवून डाॅक्टर बनणार…... राेहनचा निर्धार रोहनला कर्करोग झाल्याचे कळाले. त्यानंतर तो अत्यंत भावनिक झाला. परंतु, कर्करोगाला हरवेल अशी त्याने मनाशी खूणगाठ बांधली आहे. कर्करोगाला हरवून डाॅक्टर होण्याचेदेखील त्याने स्वप्न सांगितले. परीक्षा संपल्यानंतर राेहनच्या भावाने त्याला खांद्यावर घेऊन परीक्षा हाॅलमधून खाली आणले. त्या वेळी रोहनच्या भावाचे डोळे पाणावले होते. रोहनला पाहून इतर परीक्षार्थीदेखील भावनिक झाले होते.”
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/MzxiRl1
दिव्य मराठी विशेष:हातात सलाइनची सुई तशीच... संभाजीनगरात कर्करोगाशी झुंजणाऱ्या विद्यार्थ्याने दिली ‘नीट’
May 04, 2025
0