Type Here to Get Search Results !

नवी मुंबईत पावसामुळे सोसायटीची भिंत कोसळली:3 सेकंदामुळे वाचला एकाचा जीव, 10 ते 15 दुचाकींसह टेम्पोचे नुकसान; पाहा VIDEO

मुसळधार पावसामुळे नवी मुंबई व उल्हासनगरमध्ये दुर्घटना घडल्या आहेत. नवी मुंबईत वाशी प्लाझा या कमर्शियल सोसायटीची भिंत पडल्याने 10 ते 15 दुचाकी आणि एका टेम्पोचे नुकसान झाले. एक व्यक्ती या भिंती शेजारील उतरत होता, तितक्यात मागून ही भिंत खचली. नशीब बलवत्तर होते, म्हणून व्यक्तीचा जीव वाचला. दुसरीकडे, उल्हासनगरमध्ये पूल कोसळल्याने सुमारे 500 घरांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. वाशी हायवेला लागून असलेल्या वाशी प्लाझा कमर्शियल सोसायटीजवळ सकाळच्या सुमारास भिंत कोसळली. पावसामुळे नाल्यालगतची माती खचल्याने ही घटना घडली. एक व्यक्ती पायऱ्या उतरत असतानाच केवळ तीन सेकंदाच्या फरकाने भिंत कोसळली, त्यामुळे त्याचा जीव थोडक्यात वाचला. मात्र, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दहा ते पंधरा दुचाकी आणि एका टेम्पोवर माती व ढिगारा कोसळून वाहने दबली. ही दुर्घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. घटनेची माहिती मिळताच वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव आणि साफसफाईचे काम हाती घेतले. कोसळलेली झाडे हटवण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असून, वाहने बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. नाल्यावरचा पूल कोसळला, 500 घरांचा मार्ग बंद दुसरीकडे, उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 5 येथील गणेश नगर भागात असलेला नाल्यावरचा पूल अचानक कोसळला. एक तरुणी या दुर्घटनेत थोडक्यात बचावली. या पुलाचा वापर गणेश नगर परिसरातील सुमारे 500 हून अधिक घरांना ये-जा करण्यासाठी होत होता. परंतु, आता पूल कोसळल्याने घरांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला असून, नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हवामान विभागाचा मुंबई-कोकणसाठी पावसाचा अंदाज हवामान खात्याने मुंबईत 16 जूनला ऑरेंज अलर्ट आणि 19 जूनला यलो अलर्ट जारी केला आहे. 17 जून, 18 जून आणि २० जून रोजी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगडमध्ये 16 जूनला रेड अलर्ट, 17 जूनला यलो अलर्ट, 18 आणि 19 जूनला ऑरेंज अलर्ट आणि 20 जूनला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघरमध्ये 16 जून रोजी ऑरेंज अलर्ट, 17 आणि 18 जून रोजी हलका पाऊस, 19 जून रोजी यलो अलर्ट आणि 20 जून रोजी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ठाण्यात 16 जून रोजी ऑरेंज अलर्ट, 17 जून रोजी हलका पाऊस, 18 आणि 19 जून रोजी यलो अलर्ट आणि 20 जून रोजी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/JhPmo9z

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.