उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला गेलेल्या नागपूरच्या एका कुटुंबावर मनालीमध्ये भीषण अपघात ओढवला आहे. झिप-लाइन खेळताना बेल्ट तुटल्याने एक तरुणी 30 फूट उंचीवरून खाली पडली, यात तिच्या पायाला अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. त्रिशा बिजवे असे तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे पर्यटनस्थळांवरील साहसी खेळांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्रिशाच्या कुटुंबीयांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल संताप व्यक्त केला आहे. पर्यटन आणि तेथील सुरक्षा हा विषय ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे अनेकदा पर्यटनस्थळी साहसी खेळ खेळतानाही प्रवाशांच्या जीवावर बेतले जाते. अनेकदा पुरेशी सुरक्षा नसतानाही पर्यटकांकडून अतिउत्साहाच्या भरात जीवघेणा टास्क केला जातो. पर्यटनस्थळी साहसी खेळांमध्ये पुरेशी सुरक्षा नसल्यास कायबेतू शकते, हे त्रिशासोबत घडलेल्या घटनेवरून दिसून आले आहे. नेमके काय घडले? मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील रहिवासी प्रफुल्ल बिजवे आपल्या पत्नी आणि मुलगी त्रिशासोबत उन्हाळी सुट्टीनिमित्त मनालीला गेले होते. रविवार 8 जून 2025 रोजी त्रिशा झिप-लाइन खेळत असताना, तिला जोडलेला बेल्ट अचानक तुटला आणि ती 30 फूट खाली कोसळली. सुदैवाने, झिप-लाइनची उंची जास्त नसल्याने आणि त्रिशा उतरण्याच्या ठिकाणाजवळ असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या अपघातात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. या दुर्घटनेनंतर त्रिशावर सुरुवातील मनाली आणि नंतर चंदीगडमध्ये उपचार करण्यात आले. सध्या तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. या घटनेचा एक व्हिडीओ देखील कुटुंबीयांनी शेअर केला असून, सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. खाली पाहा घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ त्रिशाच्या कुटुंबीयांकडून संताप व्यक्त दरम्यान, या दुर्घटनेबाबत बोलताना त्रिशाच्या कुटुंबाने म्हटले की, 'तिथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. आमच्या कुटुंबाला तिथे कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे, त्रिशावर सुरुवातीला मनाली, नंतर चंदीगडमध्ये उपचार करण्यात आले. सध्या त्रिशावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेतून प्रत्येकाने धडा घ्यायला हवा. पर्यटनस्थळी साहसी खेळांसाठी मैदानात उतरताना पुरेशी व्यवस्था आहे का हे तपासायला हवं. तसेच, तेथील सुरक्षा व्यवस्था आणि धोके लक्षात घेऊनच साहसी खेळ खेळावे. अन्यथा काही वेळा हे साहस जीवावर बेतण्याची शक्यता असते.' साहसी पर्यटन की जीवघेणा धोका? या घटनेनंतर साहसी खेळांच्या आयोजकांवर तसेच स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. दरवर्षी अशा अपघातांमध्ये अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागतो किंवा गंभीर जखमा होतात. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाने कोणताही साहसी खेळ करताना सुरक्षेची खातरजमा करणे अत्यावश्यक आहे. प्रशासनानेही अशा ठिकाणी सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन होत आहे का, यावर सतत लक्ष ठेवण्याची गरज आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/4K93xCv
नागपूरच्या तरुणीचा मनालीत अपघात:झिप-लाइनचा बेल्ट तुटल्याने 30 फूट खाली पडली, सुदैवाने बचावली; थरकाप उडवणारा VIDEO
June 14, 2025
0