वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज, गुरुवार, १२ जून २०२५ रोजी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले सोयाबीन उघड्यावर टाकण्याची वेळ आली, तर व्यापाऱ्यांचा माल मात्र सुरक्षित ओट्यावर होता. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे शेकडो क्विंटल सोयाबीन पूर्णपणे ओले होऊन भिजले, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दि.१२ जून रोजी सकाळी बाजार समितीत शेतकऱ्यांनी आपला शेतमाल, विशेषतः सोयाबीन, विक्रीसाठी आणला होता. बी-बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी हा माल विक्रीस आणला होता, कारण मागील काही दिवसांपासून नाणेटंचाईमुळे मंगरूळपीर बाजार समिती बंद होती. मात्र, मार्केट कमिटीच्या बांधून असलेल्या छताखाली व्यापाऱ्यांचे सोयाबीन टाकलेले असल्याने शेतकऱ्यांसाठी जागा उपलब्ध नव्हती. परिणामी, शेतकऱ्यांना आपला माल उघड्यावर टाकावा लागला. वजनकाटे चालू असतानाच पावसाळ्याचा पहिला पाऊस सुरू झाला. यामुळे उघड्यावर असलेल्या शेतकऱ्यांचे शेकडो क्विंटल सोयाबीन पूर्णपणे ओले झाले आणि भिजले. याउलट, व्यापाऱ्यांचा माल ओट्यावर सुरक्षित असल्याने त्यांना कोणताही फटका बसला नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा दुहेरी भेदभाव शेतकऱ्यांच्या तीव्र नाराजीला कारणीभूत ठरला आहे. या गंभीर प्रकारामुळे "महाराष्ट्र राज्यातून कौतुकास पात्र ठरलेल्या" मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शेतकऱ्यांचा ओला झालेल्या मालाला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सावरगाव येथील शेतकरी तेजस जनार्दन राऊत यांनी काल, बुधवार, ११ जून २०२५ रोजीच कृषी उत्पन्न बाजार समितीला निवेदनात पावसाची नैसर्गिक आपत्तीची भीती व्यक्त करून अवगत केले होते. असे असतानाही कृषी उत्पन्न बाजार समितीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आजची आपत्तिकाल शेतकऱ्यांवर ओढवला, असे राऊत यांनी म्हटले आहे. या प्रकारासाठी जबाबदार असणाऱ्यांवर त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी तेजस राऊत यांनी केली आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/HFeuPtB
मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल उघड्यावर:पावसामुळे सोयाबीन भिजले, शेतकऱ्यांचे हाल; सोयाबीन भिजले, शेतकऱ्यांचे हाल
June 12, 2025
0