Type Here to Get Search Results !

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुभाष सावरकर यांचे निधन:साहित्य क्षेत्रात शोककळा, मराठी जनसाहित्य परिषदेचे संस्थापक होते

ज्येष्ठ साहित्यिक आणि मराठी जनसाहित्य परिषदेचे संस्थापक डॉ. सुभाष सावरकर यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी, ४ जानेवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. सावरकर यांची अंत्ययात्रा रविवारी दुपारी १२ वाजता अमरावती येथील त्यांच्या ५३, जनसाहित्य शिल्पकला, शेगाव-रहाटगाव मार्गावरील निवासस्थानाहून निघेल. हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे. निधनाचे वृत्त कळताच प्राचार्य डॉ. सतीश तराळ, विष्णू सोळंके, संजय वाघुके यांच्यासह अनेक साहित्यिकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. डॉ. सुभाष सावरकर हे वाङ्मय मासिक ‘अक्षर वैदर्भी’चे संस्थापक आणि कार्यकारी संपादक होते. त्यांना ‘जनसारस्वत’ म्हणून ओळखले जात असे. ते कथाकार, कादंबरीकार, समीक्षक आणि कवी असे चतुरस्त्र लेखन करणारे साहित्यिक होते. शिक्षणाने ते एम.ई. (इंजिनिअर) होते आणि त्यांनी इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. एम.ई. झाल्यानंतर त्यांनी मराठीत एम.ए. केले आणि इंदूर विद्यापीठातून अस्तित्ववादावर पीएच.डी. पदवी मिळवली. १९८४ साली त्यांनी ‘अक्षरवैदर्भी’ मासिक सुरू केले आणि त्याद्वारे ‘जनसाहित्य’ ही संकल्पना रुजवली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांमध्ये ‘तुकडोजी विचारधारा’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनीच हा अभ्यासक्रम तयार केला होता. त्यांना दोन वेळा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. ‘आत्मा’ या कादंबरीसाठी आणि ‘जन भाषेच्या शोधात’ या त्यांच्या भाषाशास्त्रीय संशोधनपर पुस्तकासाठी त्यांना गौरवण्यात आले होते.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/V6dIKf3

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.