श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे पुण्यात आलेल्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आयाेजित शिबिरात ११,७६४ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य शिबिर उद्घाटनप्रसंगी दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, आमदार व सरचिटणीस हेमंत रासने, सहचिटणीस अमाेल केदारी तसेच मंडळाचे राहुल चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, तुषार रायकर, सनी सिद्धा, इंद्रजीत रायकर, राजाभाऊ पायमोडे, सुनील जाधव यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते. बुधवार पेठेतील उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे हे शिबिर घेण्यात आले. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगीकारून ट्रस्ट कार्यरत असून आराेग्य व नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात डाेळ्यांची तपासणी, चष्मेवाटपासह वारकऱ्यांना प्रवासादरम्यान येणाऱ्या विविध आराेग्यविषयक अडचणींची तपासणी करण्यात आली. अंगदुखी, डोकेदुखी, बीपी, शुगर यांसारख्या आजारांवर मोफत औषधे देण्यात आली. तसेच फिजिओथेरपी देखील करून देण्यात येणार आहे. शिबिरात २५ रुग्णालयातील ३७५ डाॅक्टरांसह अनेक स्वयंसेवकांनी भाग घेतला. दरम्यान, सकाळी १५ हजार वारकऱ्यांना नाश्ता व चहा व पाणी देण्यात आले. तसेच पुण्यात पालख्यांचे आगमन हाेताना मंदिरासमाेर पालख्यांवर पुष्पवृष्टीही करण्यात आली. दुगड ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान, दहा हजार शबनम बॅग वाटप आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचा शनिवारी पुण्यात मुक्काम आहे. दरवर्षी प्रमाणे पुण्यातील दुगड ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांचे यंदाही जोरदार स्वागत करण्यात आले. या विषयी माहिती देताना गौरव प्रमोद दुगड म्हणाले, दुगड ग्रुप आणि पुष्पा स्टील च्या वतीने मागील 25 वर्षा हून अधिक काळ वारकऱ्यांची सेवा करण्यात येते. आज दहा हजार वारकऱ्यांना शबनम बॅग वाटप करण्यात आल्या आहेत, महिला वारकऱ्यांना साड्याही वाटप करण्यात आल्या. याशिवाय दरवर्षी प्रमाणे 500 हून अधिक वारकऱ्यांसाठी पंढरपूर ला जाईपर्यंत पुरेल अशी शिदोरी देण्यात आली आहे, यामध्ये गडू, तांदूळ, साखर, गूळ, शेंगदाणे, साबुदाणा, गुडदाणी, बिस्किट आदिचा समावेश आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/E84AaPb
दगडूशेठ गणपतीच्या जय गणेश रुग्णसेवा अभियानात मोठी कामगिरी:११ हजारांहून अधिक वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी; २५ रुग्णालयांतील ३७५ डॉक्टरांचा सहभाग
June 21, 2025
0