महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील गोदावरी नदीत सहा मुले बुडाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. सिरोंचा तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगणातील मेडीगड्डा धरणाजवळ ही घटना घडली असून, बुडालेल्या मुलांचा शोध अद्याप लागलेला नाही. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्राचा शेवटचा तालुका असलेल्या सिरोंचा तालुक्यालगतच्या तेलंगणाच्या हद्दीत असलेल्या मेडीगड्डा धरण परिसरात गोदावरी नदीत ही सहा मुले आंघोळीसाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुले नदीत बुडाली. गोदावरी नदीला वाहते पाणी असल्याने या पाण्यात मुले वाहून गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बुडालेली सर्व मुले 11 ते 18 वयोगटातील पत्ती मधुसूदन (15), पत्ती मनोज (13), कर्नाळा सागर (14), तोगरी रक्षित (11) चौघेही रा. आंबटपल्ली, तेलंगणा, तर पांडू (18) व राहुल (19, दोघे रा. कोरलाकुंडा, तेलंगणा) यांचा बुडालेल्यांमध्ये समावेश आहे. ही मुले 11 ते 18 वयोगटातील असून सर्व जण महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या तेलंगणाच्या अंबडपल्ली येथील एका लग्नासाठी आले होते. पण नदीमध्ये अंघोळ करणे त्यांच्या जीवावर बेतले असून सहा जणांवर काळाने घाला घातला आहे. रात्र झाल्याने शोधमोहीम राबवण्यात अडचण घटनेची माहिती मिळताच स्थानिक तेलंगाणा पोलिस, कुटुंबीय व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले असून मच्छीमारांच्या साहाय्याने शोधमोहीम राबवली जात आहे. रात्रीपर्यंत मदतकार्य सुरू होते, मात्र अद्याप मुलांचा शोध लागलेला नाही. रात्र झाल्याने शोध मोहीम राबवणे कठीण झाले असून उद्या सकाळपर्यंत या संदर्भात मुलांचे नेमके काय झाले हे स्पष्ट होईल. कुटुंबीयांचा नदीकाठी आक्रोश या घटनेनंतर मुलांच्या नातेवाईक व कुटुंबीयांनी गोदावरी नदीकाठी गर्दी केली. महाकाय पात्रात बुडालेली ही मुले सुखरुप परत यावीत यासाठी देवाचा धावा करत काळीज पिळवटणारा आक्रोश केला, त्यामुळे परिसर सुन्न झाला होता. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले. नांदेडमध्ये माय-लेकीसह पुतणीचा अंत दुसरीकडे नांदेडमधील उमरी तालुक्यातील भायेगाव येथे कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या माय-लेकीसह पुतणीवर काळाने घाला घातला. नदीत पाय घसरून पडल्यानंतर एकमेकींना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण पोहता येत नसल्याने तिघीचांही मृत्यू झाला. शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये 12 आणि 14 वर्षाच्या मुलींचा समावेश आहे. या घटनेने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. महानंदा भगवान हणमंते (वय 35), पायल भगवान हणमंते (वय 14) आणि ऐश्वर्या लालू हणमंते (वय 12) अशी मृतांची नावे आहेत. या तिघीही महागाव येथील रहिवासी आहेत. ग्रामस्थांनी बोटीवर गळ टाकून तिघींचे प्रेत पाण्याबाहेर काढले आहे. उमरी पोलिस स्थानकात आकस्मित मृत्युच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/d7Zsmj9