अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्रीतून मिळणारा पैसा देशविरोधी आणि दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात आहे. अनेक अतिरेकी संघटनांचे जाळे यामध्ये कार्यरत असल्याचे प्रा.डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले. प्रत्यक्ष युद्ध न करता अंमली पदार्थांद्वारे देशातील तरुण पिढीवर हल्ला करण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. पूर्वी अंमली पदार्थांची सवय इयत्ता आठवीपासून मुलांमध्ये दिसत होती. आता मात्र पाचवी-सहावीच्या मुलांनाही लक्ष्य केले जात आहे. दारू, तंबाखू, गुटखा, सिगरेट, हुक्का ही व्यसने प्रयत्नपूर्वक सोडवता येतात. परंतु अंमली पदार्थांचे व्यसन सोडवणे अतिशय कष्टदायक आणि खर्चिक आहे. यामुळे व्यसनी व्यक्तीसह त्याचे संपूर्ण कुटुंब देशोधडीला लागते. या समस्येविरुद्ध लढण्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था आणि प्रसार माध्यमांनी एकत्रित लढा उभारला पाहिजे, असे प्रतिपादन अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचे समुपदेशक आणि महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे सदस्य प्रा.डॉ. मिलिंद भोई यांनी केले. रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे आणि इंद्रायणी विद्यालय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने "अंमली पदार्थ आणि तरुणाई" या विषयावर आयोजित व्याख्यानसत्रात ते बोलत होते. महाराष्ट्र सरकारने अंमली पदार्थ विरोधी गुन्हे मकोका कायद्यांतर्गत आणण्याचे पाऊल उचलले आहे, ही स्तुत्य बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास इंद्रायणी शिक्षण संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष परदेशी, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक संतोष परदेशी यांनी तरुणाईला पडत असलेला अंमली पदार्थांचा विळखा ही देशाच्या दृष्टीने गंभीर समस्या असल्याचे सांगितले. या विरोधात लढण्यासाठी रोटरी क्लबसारख्या संस्था मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचे कार्य करीत आहेत. समाजाच्या सर्व स्तरांतून या कार्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/tkbldY6
अंमली पदार्थांद्वारे तरुणपिढीवर अप्रत्यक्ष हल्ला:दहशतवाद आणि अंमली पदार्थ एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रा.डॉ. मिलिंद भोई यांचे मत
July 27, 2025
0