मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शनिवारी दुपारी खोपोली परिसरातील बोरघाटात ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने ३० हून अधिक वाहनांना ठाेकरले. या अपघातात एका प्रवासी महिलेचा मृत्यू झाला तर सुमारे ३५ प्रवासी जखमी झाले. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. हा अपघात खोपोली पोलिस ठाणे हद्दीत नवीन बोगदा ते फूड मॉल हॉटेलदरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर दुपारी घडला. ब्रेक फेल झाल्यानंतर कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने त्याने अनेक चारचाकी, खासगी व मालवाहू वाहनांना ठाेकरले. अपघातात वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. काही गाड्या अक्षरशः चक्काचूर झाल्या. काही वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात बचाव पथकांना यश आले आहे. अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलिस, महामार्ग सुरक्षा पथक आणि स्थानिक प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ३० ते ३५ प्रवासी किरकोळ ते गंभीर स्वरूपात जखमी झाले अाहेत. त्यांना खोपोलीतील नगरपालिका रुग्णालयात दाखल केले हाेते. जखमींपैकी २० ते २२ जणांना पुढील उपचारासाठी इतर रुग्णालयांमध्ये हलवले आहे. परिसरातील ग्रामपंचायतींकडून अतिरिक्त रुग्णवाहिका मागवण्यात आल्या हाेत्या. वाहतूक ठप्प, रात्री उशिरा सुरळीत या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली हाेती. वाहतूक पोलिस आणि महामार्ग प्राधिकरणाकडून वाहने बाजूला करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू हाेते. रात्री उशिरा वाहतूक सुरळीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. खोपोली पोलिस आणि महामार्ग सुरक्षा विभाग अपघाताची तपासणी व पंचनामा करत अाहेत. कंटेनर चालकाच्या वैद्यकीय तपासणीसह अपघाताच्या नेमक्या कारणांची चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार ब्रेक फेल हे कारण असल्याचे समोर आले. तथापि, इतर तांत्रिक दोषाबाबतही चौकशी केली जात आहे. एक्स्प्रेस वेवर मागील ४ वर्षांत ५०० वर अपघात दरम्यान, मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर जानेवारी २०२१ ते जून २०२५ या कालावधीत ५०० वर अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये ३०० हून अधिक प्रवाशांना जीव गमवावा लागला. अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/lDHAdMU
बोरघाटात ब्रेक निकामी झाल्याने अपघात, 35 जण जखमी:मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनरची 30 वाहनांना धडक; महिला ठार
July 26, 2025
0