Type Here to Get Search Results !

धुरंधर; धीरूभाई अंबानी:गरिबीवर मात करत कोट्यवधी भारतीयांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारे भारताचे एक अप्रतिम उद्योग रत्न

आजचा भारत हा अनेक वर्षांचा संघर्ष, त्याग व असंख्य व्यक्तींच्या योगदानातून घडला आहे. स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, विचारवंत, उद्योजक व सामान्य नागरिकांनी आपापल्या परीने देशाच्या प्रगतीसाठी घाम गाळला. अनेक पिढ्यांनी एकत्र येऊन हा देश उभा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज आपण एका प्रगत व विविधतेने नटलेला भारत पाहतो. धीरूभाई अंबानी भारताचे असेच एक अप्रतिम उद्योग रत्न होते. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या या माणसाने आपले कष्ट व नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाच्या माध्यमातून भारतीय उद्योग जगताला एक नवे क्षितिज दाखवले. देशाच्या आर्थिक इतिहासात एक नवा अध्याय लिहिला. भारताच्या आर्थिक प्रगतीला गती देऊन कोट्यवधी भारतीयांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा दिली. धीरूभाईंचा आज सृतीदिन... चला तर मग आज 'धुरंधर'मध्ये पाहूया भारताच्या उद्योग जगताला एक नवी दिशा देणाऱ्या या असामान्य स्वप्नाळू उद्योगपतीची अनोखी कथा... चोरवाडच्या शिक्षकाच्या घरी जन्म धीरूभाई अंबानी यांचा जन्म 28 डिसेंबर 1933 रोजी गुजरातच्या चोरवाडा या छोटाशा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हीराचंद अंबानी, तर आईचे नाव जमनाबेन असे होते. हीराचंद शिक्षक होते. जमनाबेन गृहिणी होत्या. धीरूभाई यांना 2 भाऊ (रमणीकलाल व नथुभाई) व 2 बहिणी (त्रिलोचनाबेन व जसुमतीबेन) होत्या. धीरूभाईंचे बालपण गरिबीत गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चोरवाडच्याच शाळेत झाले. पण त्यांना शिक्षणात फारसा रस नव्हता. त्यांचा कल उद्योग व व्यवसायात होता. त्यामुळे ते बालपणी गावात भरणाऱ्या यात्रेत काहीतरी व्यवसाय करत. धीरूभाई गावच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात फार सक्रिय राहत. येमेनमध्ये पेट्रोल पंपावर केले काम धीरूभाईंना वयाच्या 16 व्या वर्षी आपले शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. त्यानंतर भावाच्या मदतीने नोकरीच्या शोधात ते येमेनच्या एडनला गेले. तिथे त्यांनी एका कंपनीच्या पेट्रोल पंपावर काम मिळाले. या काळात त्यांनी तेथील व्यापार, बाजारपेठ व व्यवसायाचे बारकावे शिकून घेतले. त्याचा भविष्यात त्यांना मोठा लाभ झाला. ते कमालीचे जिद्दी व स्वप्नाळू होते. त्यांनी आपल्या कुटुंबाला गरिबीतून वर काढण्याचा संकल्प केला. याच दृढनिश्चयाने त्यांनी रिलायन्सचे बलाढ्य साम्राज्य उभारले. माती विकण्याचा अनोखा किस्सा 1958 साली स्थापन झालेल्या रिलायन्सने भारतात व्यवसाय करण्याचे अनेक नियम व कायदे बदलले. धीरूभाईंच्या आयुष्याशी संबंधित एक अनोखा सांगितला जातो. हा किस्सा म्हणजे त्यांनी साधी माती विकून हवी ती रक्कम कमावली. कदाचित त्यांच्या व्यवसायातील या कौशल्यामुळे रिलायन्सला एवढे यश मिळाले. त्याचे झाले असे की, धीरूभाईंनी भारतात व्यवसाय सुरू करण्यापूर्वी काही दिवस येमेनमध्ये काम केले होते. या आखाती देशातील एका शेखला आपल्या बागेत गुलाब लावायचे होते. त्यासाठी त्यांना सुपीक मातीची आवश्यकता होती. धीरूभाई अंबानींना हे कळताच त्यांनी भारतातून आपल्या संपर्कांद्वारे ही माती अरबी शेखपर्यंत पोहोचवली. त्या मोबदल्यात, शेखने त्यांना मागेल की किंमत दिली. या घटनेनंतर काही दिवसांनी धीरूभाईंनी कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आणि स्वतःचा विमल ब्रँड तयार केला. पहिल्या ऑफिसमध्ये 1 टेबल 3 खुर्च्या धीरूभाईंनी बिझनेसच्या जगात पाऊल ठेवले तेव्हा त्यांच्याकडे ना वडिलोपार्जित संपत्ती होती ना बँक बॅलन्स. 1958 साली ते येमेनहून मुंबईत परतले. तिथे त्यांनी व्यापार सुरू केला. त्यांनी त्याचवर्षी रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन नावाने आपला पहिला उद्योग सुरू केला. हा एक ट्रेडिंग व्यवसाय होता. तो प्रामुख्याने मसाले व पॉलिस्टर धाग्याच्या आयात - निर्यातीवर केंद्रित होता. मुंबईतील त्यांच्या किरायाच्या कार्यालयात केवळ 1 टेबल व 3 खुर्च्या होत्या. 1977 साली पहिला IPO आणला धीरूभाईंनी 1966 साली त्यांनी रिलायन्स टेक्सटाईल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. 1973 मध्ये रिलायन्स टेक्सटाईलला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) म्हणून संबोधले गेले. रिलायन्सने 1977 साली आपला पहिला IPO आणला. कंपनी मुंबई स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध झाली. यामुळे कंपनीला आर्थिक स्थैर्य लाभले. भारतीय भांडवली बाजारासाठी हे एक नवे व धाडसी पाऊल होते. पण या एका निर्णयाने धीरूभाई अंबानी यांच्या कंपनीला केवळ आर्थिक ताकदच मिळाली नाही, तर त्यांना एक अग्रणी उद्योगपती म्हणूनही प्रस्थापित केले. रिलायन्सने 1980 साली पॉलिस्टर व पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात प्रवेश केला. याच काळात कंपनीने बॅकवर्ड इंटिग्रेशन रणनीती स्वीकारली. या अंतर्गत कच्चा माल ते तयार उत्पादनापर्यंत संपूर्ण प्रक्रिया नियंत्रित केली गेली. याच दशकात धीरूभाईंनी रिलायन्स इंडस्ट्रीजला एक प्रमुख जागतिक कंपनी बनवण्याच्या दिशेने काम केले. कर्मचाऱ्यांवर होता पूर्ण विश्वास धीरूभाई यांचा आपल्या कर्मचाऱ्यांवर फार विश्वास होता. आपले कर्मचारी कोणत्याही कठीण परिस्थितीत आपले स्वप्न पूर्ण करू शकतात, असा त्यांचा व्होरा होता. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबतचे संबंध मालक व कर्मचारी असे पारंपरिक न ठेवता जिव्हाळ्याचे ठेवले. त्यांनी त्यांचे महत्त्व जाणले. यामुळेच रिलायन्सने केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातील आंतरराष्ट्रीय बाजारातही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मुलांना मोठी स्वप्ने पाहण्याचे धडे धीरूभाईंचे 1955 साली कोकिलाबेन यांच्याशी लग्न झाले. त्यांना मुकेश व अनिल अंबानी ही दोन मुले व नीना कोठारी व दीप्ती साळगावकर ह्या 2 मुली झाल्या. धीरूभाईंनी आपल्या मुलांना मोठी स्वप्ने पाहण्याचे धडे दिले. पण सोबतच त्याची सुरूवात छोट्या पायऱ्यांनी करण्याचा सल्ला दिला. माणसाची स्वप्ने मोठी असावीत. पण त्याची सुरूवात छोट्या पायऱ्यांनी करावी. एकाचवेळी सर्वकाही मिळवण्याची धडपड करण्यापेक्षा लहान - लहान टप्पे पूर्ण करत पुढे जाणे योग्य असते. त्यामुळे आपण आपली उद्दीष्ट साध्य करण्यासाठी छोट्या गोष्टींपासूनच सुरूवात केली पाहिजे, असा त्यांचा विचार होता. मुकेश व अनिल अंबानींना गॅरेजमध्ये कोंडले होते धीरूभाई अंबानी अत्यंत कडक शिस्तीचे होते. मुकेश अंबानी यासंबंधीचा एक किस्सा सांगतात. ते म्हणतात, एकेदिवशी सायंकाळी आमच्याकडे काही पाहुणे येणार होते. मी त्यावेली 10-11 वर्षांचा होतो, तर अनिल 9 वर्षांचा होता. आम्ही दोघेही फार खोड्या करायचो. आई पाहुण्यांसाठी जेवण आणायची, पण ते आम्हीच फस्त करून टाकायचो. आमच्या वडिलांनी मोठ्या संयमाने आम्हाला समजावून सांगितले की, आता बस्स झाले. शांत बसा. पण आमचे स्वतःचे जग होते. आम्ही एका सोफ्यावरून दुसऱ्या सोफ्यावर उड्या मारत होतो. खूप खोड्या सुरू होत्या. दुसऱ्या दिवशी वडिलांनी आम्हाला बोलावले. मुकेश - अनिल, आजपासून दोन दिवस जोपर्यंत तुम्ही शहाण्यासारखे वागणार नाही तोपर्यंत तुम्ही दोघेही गॅरेजमध्ये राहणार आहात. तुम्हाला पश्चाताप होईपर्यंत तुम्हाला बाहेर येता येणार नाही. माझ्या आईने मुले लहान असल्याचे सांगत त्यांना सोडण्याची विनंती केली. पण पप्पा बधले नाही. पुढचे दोन दिवस आम्ही गॅरेजमध्ये राहिलो. आम्हाला केवळ रोटी व पाणी मिळाले. यामु्ळे आम्हाला आमच्या चुकांची जाणीव झाली. या काळात आम्हा दोघा भावांतील प्रेमही वाढले. मग आम्ही केव्हाच खोडसाळपणा केला नाही. मुकेश सांगतात, आमच्या पालन-पोषणासंबंधी बाबांचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा होता. शॉर्टकट ऐवजी कष्ट करण्याची तयारी धीरूभाईंनी आपल्या आयुष्यात केव्हाच शॉर्टकट मार्ग अवलंबला नाही. ते नेहमी मेहनतीला प्राधान्य देत. त्यांनी त्यांच्या मुलांनाही तेच शिकवले. ते म्हणत, कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी अथक परिश्रमाची गरज असते. मेहनत व सातत्य हेच यशाचे खरे रहस्य आहे. आपण आपल्या ध्येयांच्या मागे लागलो व कष्ट केले, तर यश निश्चितच मिळवता येईल. धोके पत्करण्याचा सल्ला धीरूभाईंनी रिलायन्सचा विस्तार करताना अनेक धोके पत्करले. पण त्यांनी केव्हाही हार मानली नाही. त्यांनी आपल्या मुलांना शिकवले की, धोके पत्करल्याशिवाय मोठे यश मिळवता येत नाही. आपण आपल्या आयुष्यात धोके पत्करण्यास शिकले पाहिजे. सुरूवातीला अपयश मिळाले तरी हे अपयशच भविष्यात आपल्याला योग्य ते मार्गदर्शन ठरते. धीरूभाईंनी नात्यांना व विश्वासाला नेहमीच महत्त्व दिले. त्यांचे म्हणणे होते की, व्यवसायात यश मिळवण्यासाठी नाती व विश्वास अत्यंत महत्त्वाचे आहेत. संकटांचा सामना धैर्याने करण्याची शिकवण धीरूभाईंनी संकटांना घाबरून आपला मार्ग सोडला नाही. संकटे व अडचणी या गोष्टी सर्वच यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात येत असतात, पण त्यांचा सामना धैर्याने व शहाणपणाने करणे आवश्यक असते. त्यांनी आपल्या उद्योगपती मुलांनाही संकटात शांत राहून योग्य निर्णय घेण्याचा सल्ला दिला होता. नीता अंबानींनी सांगितलेला एक किस्सा धीरूभाई अंबानींचे व्यक्तिमत्व विषद करणाऱ्या अनेक कथा आहेत. मुकेश यांच्या पत्नी नीता अंबानी त्यांचा एक किस्सा सांगताना म्हणतात, त्यावेळी माझे व मुकेशचे लग्न झाले नव्हते. 1984 च्या ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा संपला होता. मी एका डान्स शोमध्ये परफॉर्म करत होते. प्रेक्षकांमध्ये एक महिला होती. ती माझ्याकडे टक लावून पाहत होती. त्या मुकेशच्या मातोश्री कोकिलाबेन असल्याचे मला माहिती नव्हते. माझ्या मते, त्या घरी गेल्यानंतर माझ्याविषयी धीरूभाईंशी बोलल्या असाव्यात. नीता पुढे सांगतात, त्यानंतर दोन-तीन दिवसांनी मला फोन आला. फोन करणारा म्हणाला - नमस्कार मी धीरूभाई अंबानी... मी नीताशी बोलू शकतो का? मला वाटले की, समोरचा माणूस माझी मस्करी करत आहे. मी फोन ठेवला. त्यानंतर पुन्हा फोन वाजला... फोन करणारा पुन्हा म्हणाला - नमस्कार मी धीरूभाई अंबानी बोलतोय. मी नीताशी बोलू शकतो का? यावेळी मला खूप राग आला. मी अभ्यास करत होते. माझी परीक्षा होती. मी ताडकन म्हणाले - तुम्ही धीरूभाई अंबानी असाल, तर मी एलिझाबेथ टेलर आहे. असे म्हणच मी फोन ठेवला. काही वेळाने पुन्हा फोन पुन्हा वाजला. यावेळी मी माझ्या वडिलांना फोन उचलण्यास सांगितले. त्यांनी फोन उचलला. स्पीकरवर आवाज ऐकताच बाबांचा चेहरा बदलला, कारण तो खरोखर धीरूभाई अंबानी बोलत होते. त्यांनी मला फोन दिला व म्हणाले - नीता.. कृपया बोल, आणि नीट बोल. मी फोन लाईनवर आले आणि म्हणाले- गुड इव्हिनिंग अंकल. अशा प्रकारे अंबानी कुटुंबाशी माझा संपर्क झाला. सरकारशीही दोनहात करण्यास मागेपुढे पाहिले नाही धीरूभाईंनी आपल्या उद्योगाचा विस्तार अत्यंत आक्रमकपणे केला. प्रसंगी त्यांनी सरकारशी दोनहात करण्यासही मागेपुढे पाहिले नाही. औद्योगिक महत्त्वकांक्षा राजकीय समर्थनाशिवाय पूर्ण करता येत नाही हे त्यांना ठावूक होते. त्यामुळे त्यांनी इंदिरा गांधी यांच्याशी संपर्क प्रस्थापित केला. पण 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. धीरूभाईंना वाटले की, आपला संपर्क राजीव यांच्या काळातही अबाधित राहील. पण ते शक्य झाले नाही. राजीव गांधी मंत्रिमंडळात व्ही पी सिंह यांनी अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांची गोची झाली. व्ही पी सिंह यांनी अर्थमंत्री होताच काही कडक पाऊले उचलली. त्यांनी धीरूभाई अंबानी व अमिताभ बच्चन यांच्यासह अनेकांच्या ठिकाणांवर छापेमारी करण्याच्या निर्णय घेतला. यामु्ळे काँग्रेस त्यांच्यावर नाराज झाली. पण त्यांना मंत्रिमंडळातून हटवणे सोपी गोष्ट नव्हती. परिणामी, त्यांना एका मार्गाने मंत्रिमंडळाबाहेर काढून दुसऱ्या मार्गाने पुन्हा संरक्षण मंत्री म्हणून सरकारमध्ये घेण्यात आले. धीरूभाईंना आपल्या कापडाच्या कारखान्यासाठी (पॉलिस्टर धाग्यासाठी) 'पीटीए' अर्थात 'प्यूरिफाईड टॅरेफ्थॅलिक ॲसिड' आयात करावे लागत होते. पण व्ही पी सिंह अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी पीटीएला ओपन जनरल लायसन्स कॅटेगरीतून वगळून परिमिशिबल लिस्टमध्ये टाकले. त्यामुळे पीटीएची आयात करण्यासाठी सरकारची परवानगी बंधनकारक झाली. ही घटना 1985 मधील आहे. धीरूभाईंना सरकारच्या या निर्णयाची कुणकुण लागली. त्यांनी त्यावर उपाय शोधला. त्यांनी काही बँकांशी संपर्क साधून लेटर ऑफ क्रेडिट (एलसी) जारी करून घेतले. त्या आधारावर त्यांनी पुढील वर्षभर कोणत्याही अडथळ्याशिवाय पीटीएची आयात केली. पण त्यांनी हा निर्णय सरकारने निर्णयापूर्वी काही दिवस अगोदरच घेतला होता. त्यामुळे मोठा वाद झाला. ही गोष्ट व्ही पी सिंह यांच्या कानावर पडली. ते जाम भडकले. त्यांनी पीटीएच्या आयातीवर तत्काळ 50 टक्के आयात शुल्क लावले. येथूनच धीरूभाई व व्ही पी सिंह यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडली. यामुळे रिलायन्सला काही अडचणींचा सामना करावा लागला. आईसक्रीमसाठी थेट समुद्रात मारली उडी मुकेश अंबानी अनेकदा त्यांच्या वडिलांचे किस्से सांगतात. त्यांनी लेखक ए. के. गांधी यांना धीरूभाईंनी आईस्क्रीमसाठी थेट समुद्रात उडी मारण्याचा एक रंजक किस्सा सांगितला. हा किस्सा ए के गांधी यांनी आपल्या अ कम्प्लिट बायोग्राफी ऑफ मुकेश अंबानी या पुस्तकात नमूद केला आहे. मुकेश यांच्या मते, एकदा माझे वडील जहाजावरील एका पार्टीला हजर होते. जहाजापासून किनारा 1 किलोमीटर लांब होता. जहाजावरील काही लोक पैज लावत होते. त्यांनी अशी पैज लावली की, जो कुणी जहाजातून थंड पाण्यात उडी मारून किनाऱ्यावर पोहोचेल त्याला आईस्क्रीम मिळेल. हा एक विनोद होता. तो कुणीही गांभीर्याने घेतला नाही. पण माझ्या वडिलांनी ते गांभीर्याने घेतले. त्यांनी विचारले - ही डील आहे का? सर्वांना वाटले की ते फक्त विनोद करत आहेत. पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्यांनी चटकन आपला शर्ट काढला आणि पाण्यात उडी मारली. ते पोहत किनाऱ्यापर्यंत पोहोचले. ते अशा पठडीतील व्यक्ती होते. हृदयविकाराच्या झटक्याने निधन अन् मालमत्तेचा वाद धीरूभाई अंबानी यांना 24 जून 2002 रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते तब्बल 11 दिवस कोमामध्ये होते. अखेर 6 जुलै 2002 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भारतीय उद्योग जगतातील एका युगाचा अंत झाला. त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा फोर्ब्स इंडियाने त्यांना जगातील 138 वे श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान दिले होते. त्यावेळी त्यांची संपत्ती तब्बल 2.9 अब्ज डॉलर्सच्या आसपास होती. धीरूभाईंच्या निधनानंतर रिलायन्स समूहाचे विभाजन झाले. यासंबंधी झालेल्या वादांनी भारतीय उद्योगजगतात दीर्घकाळ चर्चा घडवली. कोकिलाबेन अंबानी यांच्या मध्यस्थीमुळे मुकेश व अनिल अंबानी यांच्यात व्यवसायाचे समान वाटप झाले. पण या दोन भावांमधील वैयक्तिक व व्यावसायिक दुरावा कायम राहिला. मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजला एका नव्या उंचीवर नेले, तर अनिल अंबानी यांच्या व्यवसायांना आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागला. हा वाद केवळ कौटुंबिक नव्हता, तर त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि रिलायन्सच्या प्रतिमेवरही खोल परिणाम झाला. आता धीरूभाई अंबानी यांचे काही किस्से 1. येमेनमधील नाण्याची कहाणी धीरूभाई अंबानी यांनी आपल्या करिअरची सुरुवात येमेनमधील एका कंपनीत कनिष्ठ कर्मचारी म्हणून केली. त्यावेळी येमेनमध्ये चांदीच्या नाण्यांना (रियाल) खूप मागणी होती. धीरूभाईंनी या संधीचा फायदा घेतला. येमेनमध्ये चांदीच्या नाण्यांचे मूल्य त्यातील चांदीच्या किमतीपेक्षा जास्त आहे हे त्यांनी हेरले. त्यानंतर त्यांनी ही नाणी वितळवून चांदी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. या छोट्या पण हुशारीच्या निर्णयाने त्यांना पहिली मोठी कमाई मिळवून दिली. यातून त्यांच्या प्रचंड व्यावसायिक बुद्धिमत्तेचे दर्शन घडते. 2. 'विमल' ब्रँडची निर्मिती 1960 च्या दशकात धीरूभाईंनी विमल नावाचा कापड ब्रँड सुरू केला. धीरूभाई यांच्या सासूचे नाव विमलाबेन असे होते. त्यांनी या ब्रँडला त्यांचे नाव दिले. त्यांनी गुजरातमधील नरोडा येथे छोटा कारखाना उभारला. त्यावेळी बाजारात विदेशी व महागड्या कापडांचे वर्चस्व होते, पण धीरूभाईंनी दर्जेदार व परवडणारी कापड उत्पादने सादर केली. त्यांनी डीलर्सना थेट फायदा देण्याची रणनीती अवलंबली. यामुळे विमल ब्रँड घरोघरी पोहोचला. एका साध्या ट्रेडरपासून ते कापड उद्योगातील दिग्गज बनण्याचा हा प्रवास धीरूभाईंच्या नाविन्याचा पुरावा आहे. 3. शेअर बाजारातील क्रांती रिलायन्सने 1977 मध्ये पहिल्यांदा IPO आणला. धीरूभाईंनी सामान्य गुंतवणूकदारांना कंपनीत सहभागी करून घेतले. त्यांना शेअर बाजाराची ताकद समजावून सांगितली. त्यांनी गुजरातमधील छोट्या गावांमध्ये जाऊन लोकांना रिलायन्सचे शेअर्स खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे सामान्य माणसाला शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची संधी मिळाली. रिलायन्सच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळवून दिला. यामुळे धीरूभाईंची लोकप्रियता प्रचंड वाढली. 4. पोलादी हात, पण हळवे हृदय धीरूभाई कठोर व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी ओळखले जात होते, पण त्यांचे हृदय तेवढेच हळवे होते. एकदा एका कर्मचाऱ्याने कंपनीत आर्थिक गैरव्यवहार केल्याचे त्यांना समजले. हा कर्मचारी धीरूभाईंना भेटला, तेव्हा त्यांनी त्याला दंड न करता दुसरी संधी दिली. त्याला प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला दिला. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी आदर व निष्ठा निर्माण झाली. 5. जामनगर रिफायनरीचे स्वप्न धीरूभाईंनी 1990 च्या दशकात गुजरातच्या जामनगर येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी उभारण्याचे स्वप्न पाहिले. अनेकांनी याला अशक्य मानले, कारण हा प्रकल्प प्रचंड खर्चिक व जोखमीचा होता. पण धीरूभाईंचा दृष्टिकोन व कठोर परिश्रमामुळे 1999 मध्ये ही रिफायनरी कार्यान्वित झाली. आज ती रिलायन्सच्या यशाचा कणा आहे. ही रिफायनरी धीरूभाईंच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक मानली जाते. 6. ग्रोथ इज लाइफचा मंत्र धीरूभाईंना एकदा एका पत्रकाराने विचारले, तुम्ही एवढ्या वेगाने विस्तार का करता? त्यावर धीरूभाई म्हणाले, तुम्ही वाढ होत नसेल, तर तुम्ही मरत आहात. हा मंत्र आजही रिलायन्सच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या व व्यवसाय रणनीतीच्या केंद्रस्थानी आहे. 7. राजकीय व सामाजिक प्रभाव धीरूभाईंचा व्यवसायाबरोबरच राजकीय व सामाजिक क्षेत्रातही प्रभाव होता. असे म्हटले जाते की, धीरूभाईंचे अनेक राजकीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. यामुळे त्यांना सरकारी धोरणांचा फायदा मिळाला. तथापि, त्यांनी नेहमीच आपल्या व्यवसायाला प्राधान्य दिले आणि सामान्य माणसाला सक्षम बनवण्यावर भर दिला. धुरंधर मालिकेतील खालील स्टोरीज वाचा... धुरंधर-31; राजर्षी शाहू महाराज:अस्पृश्याला मानाचे पान अन् नांगरासाठी तोफा वितळवून लोखंड देणारे शाहू महाराज ग्रेट का होते? धुरंधर-30; चे गेव्हारा:अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द जागवून अवघ्या जगातील क्रांतीचा चेहरा बनलेला तुमच्या 'T शर्ट'वरील क्रांतिदूत धुरंधर-29; संत कबीर:पैशांच्या मागे पळणाऱ्यांचा देव कसा? असा परखड सवाल करत समस्त मानवतेला साधेपणाचा संदेश देणारा महानायक धुरंधर-28; राणी चेन्नम्मा:स्वकियांची फंदफितुरी जमिनीत गाडून 1857 च्या सशस्त्र उठावापूर्वी इंग्रजांना धूळ चारणारी 'कर्नाटकची लक्ष्मीबाई' धुरंधर-27; अहिल्याबाई होळकर:न्यायबुद्धीने स्वतःच्या नवऱ्याला धारेवर धरत चोराच्याही पोटाचा प्रश्न सोडवणाऱ्या दूरदृष्टीच्या शासक धुरंधर-26; डॉ. जयंत नारळीकर:ब्रह्मास्त्र होते तर रामाच्या राज्यात वीज होती का? असा झोंबणारा प्रश्न करणारा भारताचा मराठमोळा शास्त्रज्ञ धुरंधर-25; मुथुलक्ष्मी रेड्डी:महिला हक्क अन् आईचे 'देवदासी'पण पाहून त्याविरोधात लढा पुकारणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला आमदार धुरंधर-24; कुलदीपसिंग चांदपुरी:पाकच्या 2000 हून अधिक सैनिकांना 120 जवानांच्या बळावर धूळ चारणारा लढवय्या; '1971' ची अमर गाथा धुरंधर-23; चंद्रप्रभा सैकियानी:पडदा प्रथेवर लाथ घालून महिलांना आभाळ खुले करणारी आसामची हिरकणी; कुमारी माता झाली तरी डगमगली नाही धुरंधर-22; कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील:महाराष्ट्राच्या मातीत शिक्षणाचा सूर्य पेरून उपेक्षितांच्या झोपडीत ज्ञानाचे पीक काढणारा खरा 'धुरंधर' धुरंधर-21; प्रबोधनकार ठाकरे:मराठी समाज मनात मोक्याच्या ठिकाणी पक्क्या गाठी मारून जातिभेदांच्या जखमांचा खोलवर शोध घेणारा बहुजन हिंदुत्त्ववादी धुरंधर-20; भीमराव रामजी आंबेडकर:चवदार तळ्याला ताळ्यावर आणणारा दलितोद्धारक अन् सामाजिक समरसतेचा खरा विवेकी शिल्पकार धुरंधर-19; जिगर मुरादाबादी:'शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता जहाँ खुदा नहीं,' असे म्हणत मौलवींकडून टाळ्या पिटवून घेणारा सूफी शायर धुरंधर-18; आनंदीबाई जोशी:'पृथ्वीच्या पाठीवर हिंदुस्तान इतका दुसरा रानटी देश नाही', असे ठणकावून सांगणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर धुरंधर-17; भगतसिंग:'बॉम्ब अन् पिस्तुले क्रांती आणत नाहीत, क्रांती लोकांच्या मनात जन्मते', असे ठामपणे सांगणारा 'शहीद ए आझम' धुरंधर-16; शहाजीराजे भोसले:छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रेरणास्थान अन् बृहन्महाराष्ट्राची स्थापना करणारा धोरणी राजा धुरंधर-15; ई. व्ही. रामासामी:देव आहे हे सिद्ध करण्याचे आव्हान देत तर्कशुद्ध अन् निर्भय मतांद्वारे समाजात क्रांती घडवणारा भारताचा 'पेरियार' धुरंधर-14; कार्नेलिया सोराबजी:रूढी परंपरांना आव्हान देत शिक्षण, समानता अन् मानवी हक्कांसाठी अथक झगडणारी भारताची पहिली महिला बॅरिस्टर धुरंधर-13; खासेराव जाधव:बहुजन समाजाच्या खांद्यावरील निरक्षरतेचे 'जू' काढून त्यांना उच्च शिक्षणाच्या गंगेचे पाणी पाजणारा अवलिया धुरंधर-12; तंट्या भिल्ल:आदिवासींमध्ये राष्ट्रीयत्व जागवणारा 'रॉबिनहूड', थोर स्वातंत्र्यसैनिक; वाचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाचे सोनेरी पान धुरंधर-11; विठ्ठल सखाराम पागे:उकिरड्याला खरकटे माहिती नसल्याच्या काळात 'भूकबळी'वर नामी उपाय शोधणारा राजकारणी धुरंधर-10; मोहन हिराबाई हिरालाल:विनोबा भावेंचे 'सर्वायतन' नक्षलग्रस्त गडचिरोलीत रुजवणारा अन् गरिबांना लक्ष्मीदर्शन घडवणारा अवलिया धुरंधर-9; फातिमा शेख:सावित्रीमाईंची मैत्रीण अन् भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका; फातिमा एक काल्पनिक पात्र होत्या का? तुम्हीच ठरवा धुरंधर-8; एकनाथ दगडू आवाड:बापाचा बुचडा कापून 'पोतराज' प्रथेवर घाव घालणारा पोरगा; कथित गुन्हेगारीने बदनाम झालेल्या बीडचा थोर माणूस धुरंधर-7; स्वामी विवेकानंद:मानवतेचा उत्कृष्ट प्रेमी, महान निधर्मी तत्ववेत्ता; नरेंद्रनाथ दत्त यांचे अखेरचे काही तास कसे होते? धुरंधर-6; कंदुकुरी वीरेशलिंगम पंथुलु:अंधश्रद्धेवर लाथ घालून विधवा पुनर्विवाह अन् ज्ञानाची वात पेटवणारा आंध्रचा 'लेखणी'सम्राट धुरंधर-5; भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड:दोन वेळा वाचवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राण धुरंधर-4; डॉ. विश्राम रामजी घोले:महिला उत्थानासाठी पेटून उठलेला सुधारक, ज्यांची 'बाहुली' ठरली स्त्री शिक्षणाची पहिली बळी धुरंधर-3; पार्वतीबाई आठवले:वैधव्य अन् परावलंबन दैवी भोग मानणारी, पण पोटच्या गोळ्याच्या काळजीने असामान्य झालेली एक निरक्षर स्त्री धुरंधर-2; बसव प्रेमानंद:अंधश्रद्धेच्या खाटेवर आजारी पडलेल्या समाजाला विज्ञानाचे औषध देऊन चमत्कारांची पुरती हवा काढणारा थोर दार्शनिक धुरंधर-1; नरहर अंबादास कुरुंदकर:विचारांची श्रीमंती वाढवणारा अन् आजच्या किर्र वैचारिक काळोखात प्रकाशवाट दाखवणारा थोर विचारवंत

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/izjE5ns

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.