'मी उदयनराजे भोसले बोलतोय. माझ्या मित्राला तू भेटणार होतास. त्याच्या कामाचे काय झाले? तुझ्या मॅनेजरशी बोलून घे आणि त्याचे काम करून दे', असा बॉलिवूड अभिनेता अमिर खानला फोन आणि मेसेज करणाऱ्या अज्ञात भामट्यावर सातारा येथील शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी उदयनराजेंचे स्वीय सहाय्यक पंकज चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. भामट्याने आमिर खान यांच्याशी तीन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून दि. 13 जानेवारी 2025 ते दि. 14 जुलै 2025 या दरम्यान संपर्क साधला. तसेच त्याने मुंबईत जाऊन आमिर खानची भेटही घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस पथक त्याचा शोध घेत आहे. मोठ्या बॅनरच्या हिंदी चित्रपटांचे पाचगणी परिसरात चित्रीकरण सुरू असते. चित्रीकरणाच्या दरम्यान खा. उदयनराजे भोसले आपल्या आवडत्या कलाकारांची भेट घेत असतात. हे सर्वज्ञात आहे. त्याचा गैरफायदा भामट्याने घेतला. बॉलिवूडच्या संपर्कात असणारा पांचगणीतील अमीन हा खा. उदयनराजे भोसले यांचे स्वीय सहाय्यक आणि या प्रकरणातील तक्रारदार पंकज चव्हाण यांचा मित्र आहे. उदयनराजे भोसले यांच्या नावाने आमिर खानला फोन आणि मेसेज गेल्याने स्वतः आमिर खान संबंधित नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. मात्र फोनला प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणून आमिर खानचा मॅनेजर बॉबी याने पांचगणीतील अमीनशी संपर्क साधून खात्री करण्यास सांगितले. आमिर याने पंकज चव्हाण यांना फोन करून 'खा. उदयनराजे भोसले हे आमिर खानला भेटू इच्छितात का? याची चौकशी केली. तसेच, आमिर खानचे मॅनेजर बॉबी यांचा मोबाईल नंबर दिला. पंकज चव्हाण यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा केली असता 'आपण अमिर खानला फोन अथवा मेसेज केला नसल्याचे त्यांनी सांगितले. पंकज चव्हाण यांनी आमिरचा मॅनेजर बॉबीशी संपर्क साधल्यानंतर भामट्याचा प्रताप उघडकीस आला. खा. उदयनराजे भोसले यांचे स्वीय सहाय्यक पंकज चव्हाण यांनी तातडीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्या विरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याच्या शोधात पोलिसांचे एक पथकही रवाना करण्यात आले आहे. संबंधित भामटा हा पुण्यातील असल्याचा पोलिसांना संशय आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/qaNFHpi
उदयनराजेंच्या नावाने थेट अभिनेता अमिर खानला केला फोन:अज्ञाताविरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
July 17, 2025
0