Type Here to Get Search Results !

निवडणूक तापायला लागली:जि.प. प्रभागरचना अंतिमतेकडे, आज आयुक्त कलेक्टरला सोपवणार दस्तऐवज

अमरावती जिल्हा परिषदेची प्रभाग रचना अंतिमतेच्या प्रवासाकडे वाटचाल करत आहे. सोमवार, ११ ऑगस्टला विभागीय आयुक्त मतदारसंघांच्या रचनेचा अंतिम मसुदा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे सोपवणार आहेत. राज्य शासनाच्या वेळापत्रकानुसार मतदारसंघाचे प्रारुप घोषित झाल्यानंतर त्यावरील आक्षेपांची सुनावणी १ ऑगस्टला घेण्यात आली. विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या दालनात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत ही सुनावणी पार पडली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाचे प्रारुप आयुक्तांकडे सुपूर्द केले होते. त्यांनी प्राप्त झालेल्या आक्षेप व सूचनांचा परामर्श घेतला होता. नव्या रचनेमध्ये चांदूर रेल्वे तालुक्यातील एक मतदारसंघ कमी झाला आहे. अचलपुर तालुक्यात एक मतदारसंघ वाढला आहे. मेळघाटच्या दोन्ही तालुक्यातील एका मतदारसंघाचा अपवाद वगळता इतर सर्व मतदारसंघांची नावे बदलण्यात आली आहेत. इतर तालुक्यातही मोजक्या मतदारसंघांची नावे बदलण्यात आली आहेत. काही ठिकाणी जवळची गावे सोडून दूरची गावे एखाद्या मतदारसंघात समाविष्ट करण्यात आल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. सुनावणीअंती या तक्रारींबाबत काय निर्णय झाला हे आयुक्तांकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर होणाऱ्या मसुद्यावरून स्पष्ट होईल. हा मसुदा सार्वजनिक करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे आणखी एक आठवड्याचा अवकाश आहे. जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांबाबत १८ तक्रारींची सुनावणी घेतल्यानंतर विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी घेतलेल्या निर्णयाचे प्रतिबिंब जिल्हाधिकारी यांना प्राप्त होणाऱ्या मसुद्यात असेल. नागरिकांना १८ ऑगस्टपर्यंत या अंतिम घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/SzBd9wa

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.