Type Here to Get Search Results !

मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा फटका:आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू, 892 घरांची पडझड; जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडले

मराठवाड्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाल्याची गंभीर आकडेवारी समोर आली आहे. या पावसामुळे विभागात एकूण 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. एकूण 892 हून अधिक घरांची पडझड झाली असून, अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मानवी हानीचा विचार केल्यास, अतिवृष्टीत झालेल्या 6 मृत्यूंपैकी नांदेड जिल्ह्यात वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर धाराशिव जिल्ह्यात 3 जण वाहून गेले. नांदेड आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. याव्यतिरिक्त, धाराशिव जिल्ह्यात 5, तर बीड जिल्ह्यात 1 व्यक्ती जखमी झाली आहे. जीवित हानीबरोबरच पशुधनाचेही मोठे नुकसान झाले असून, विभागात एकूण 213 जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. यामध्ये धाराशिवमध्ये सर्वाधिक 81 आणि जालना जिल्ह्यात 40 जनावरांचा समावेश आहे. दगावलेल्या जनावरांमध्ये दुधाळ (98 मोठी, 86 लहान) आणि ओढकाम करणाऱ्या (25 मोठी, 7 लहान) जनावरांचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील एकूण 892 खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. यात धाराशिव जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला असून, येथे 611 घरांचे नुकसान झाले आहे. याशिवाय, लातूरमध्ये 89, छत्रपती संभाजीनगरमध्ये 73, नांदेडमध्ये 56, परभणीमध्ये 42 आणि जालन्यात 21 घरांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. खासगी मालमत्तेसोबतच सार्वजनिक सुविधांचाही मोठा फटका बसला असून, मराठवाड्यात एकूण 9 पूल वाहून गेले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये प्रत्येकी 4, तर परभणीतील एका पुलाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 4 रस्ते वाहून गेल्याने वाहतूक खंडित झाली आहे. शैक्षणिक सुविधांमध्येही नुकसान झाले असून, धाराशिवमधील 6 आणि छत्रपती संभाजीनगरमधील 2 अशा एकूण 8 शाळांचेही नुकसान झाले आहे. मराठवाड्याला बसलेल्या या मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे तातडीने मदतकार्य आणि पुनर्वसन करण्याची गरज निर्माण झाली आहे. गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीला पूर आला आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्येही पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक लक्षणीय वाढली आहे. परिणामी, धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. जायकवाडी धरणाच्या 27 दरवाजांतून 2.92 लाख क्युसेक वेगाने विसर्ग सुरू सध्या जायकवाडी धरणातून 2 लाख 92 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचे एकूण 18 नियमित आणि 9 आपत्कालीन दरवाजे (एकूण 27 दरवाजे) उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढे नांदेड जिल्ह्यातही पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या गावांच्या शेतांमध्ये पाणी साचल्याची माहिती आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे पुढील 24 तास गोदावरी नदीकाठच्या लोकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/7ucBedg

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.