Type Here to Get Search Results !

निंभी येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या:नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे घेतला टोकाचा निर्णय, दिवाळीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा

सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे नजिकच्या निंभी येथे एका तरुण शेतकऱ्याने ऐन दिवाळीच्या दिवशी आत्महत्या केली. राहुल यशवंत छापाने असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी विषारी औषध प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे गावातील नागरिक व घरातील कुटुंब दीपावलीचा सण साजरा करण्यात मग्न असताना राहुल छापने यांनी राहत्या घरी मंगळवारी दुपारी तीन वाजता विषारी औषध प्राशन केले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आले. परंतु उपचार सुरू असतानाच मंगळवारी रात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. आज, बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास निंभी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे वृद्ध माता-पिता व मोठा परिवार आहे. राहुल छापाने यांच्याकडे ६ एकर शेती आहे. यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी सोयाबीन या नगदी पिकाची लागवड केली होती. परंतु सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते निराश झाले होते. राहुल यांनी खाजगी सावकार व नातेवाईकांकडून व्याजाने रक्कम घेऊन खरीप हंगामात सोयाबीनची लागवड केली होती. ती रक्कम परत कशी करावी, ही त्यांची विवंचना होती.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/KcJ3jQT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.